पुणे महापालिका हद्दीत समावेश झालेल्या 23 गावांसाठी राज्य सरकारचा ‘ मोठा ‘ निर्णय

शेअर करा

पुणे महापालिका निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 23 गावांबाबत राज्य सरकारने आज एक महत्वाचा निर्णय घेतलाय. तशी माहिती शिवसेनेचे नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे . पुणे महापालिका हद्दीत समावेश करण्यात आलेल्या 23 गावातील शाळा, जमिनी, अंगणवाड्या या सर्व जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागांना मंजुरी दिल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नगरविकास, महसूल, ग्रामविकास या सर्व विभागांना एकत्र आणून या गावांबाबत निर्णय घेण्यात आला. महापालिका कशी सक्षम होईल त्या दृष्टीकोनातून ही बैठक होती. ही कुठलीही राजकीय बैठक नव्हती, तर शासकीय बैठक होती. पुणे महापालिकेच्या हद्दवाढीतील सर्व शाळा, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी यांचा महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

पुणे महापालिका हद्दीतील म्हाडाच्या जुन्या मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनाची कामे तातडीने मार्गी लावण्याच्या, तसंच हद्दीत समाविष्ट गावांमधील शाळा, अंगणवाड्या पुणे महापालिकेला हस्तांतरीत करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे पाणीयोजनांचे हस्तांतर तसेच पुणे महानगरपालिका विकास आराखड्यातील बालग्राम प्रमाणेच अग्रसेन शाळेची जागा महापालिकेला हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविण्याची सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत केली. पुणे शहराच्या जलद व सर्वसमावेशक विकासासाठी राज्य सरकार कट्टीबध्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी बैठकीत केला.

महापालिकेमध्ये नव्याने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात तीन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. २०१७ मध्ये महापालिकेमध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट केली जाणार असल्याचे त्यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र तीन वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २३ गावे समाविष्ट करण्यासंदर्भात हालचालींना वेग आला.

कोणती गावे होणार समाविष्ट ?

म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.

पुणे शहराची नवी हद्द

  • उत्तरेस – कळस, धानोरी व लोहगाव गावांची हद्द
  • पूर्वेस – मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, फुरसुंगी या गावांची हद्द
  • आग्नेय – उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी या गावांची हद्द
  • दक्षिणेस – धायरी, वडाचीवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, भिलारेवाडी या गावांची हद्द
  • नैऋृत्य – नांदेड, खडकवासला, नांदोशी, कोपरे या गावांची हद्द
  • पश्‍चिमेस – कोंढवे-धावडे, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, म्हाळुंगे, सूस या गावांची हद्द
  • वायव्य – बाणेर, बालेवाडी या गावांची हद्द

शेअर करा