तुषार भोसले यांचे उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना ‘ असे ‘ आव्हान , सोशल मीडियात पार ….

शेअर करा

यंदाची आषाढीची पायी वारी कोणत्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणारच. सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राज्य सरकारने वारकऱ्यांची मागणी धुडकावली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे. तुषार यांच्या या विधानावर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली असून तुषार यांचा नेटीझन्सकडून खरपूस समाचार घेण्यात येत आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव असताना वारीवरून राजकारण करणाऱ्या भाजपावरही लोक टीकास्त्र सोडत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीवर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात संचारबंदी लागू होण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने तुषार भोसले यांच्या माध्यमातून राजकारण करण्यास सुरुवात केली आहे मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी झालेले हाल पाहता बहुसंख्य लोक सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत तर भाजप मात्र वारीच्या असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

तुषार भोसले म्हणाले , ‘ मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली. पण सत्तेच्या नशेत गुंग झालेल्या सरकारने वारकऱ्यांच्या परंपरेला आणि भावनेला साफ धुडकावलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी पुढील परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. पायी वारी ही कोणत्याही परिस्थितीत होणारच. सविनय कायदेभंग काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल.

मी स्वत: यंदा पायी पंढरपूरला जाणार आहे. वारकरी रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ भाजपशी आहे, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे. कुंभमेळ्याचे शेवटचे शाही स्नान झाल्यामुळे वारीला एवढी गर्दी होणार नाही. पालखी सोहळ्यात गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वारकरी संप्रदाय तयार होता. मात्र, सरकारने परस्पर निर्णय घेतला.

आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही मागील वर्षीप्रमाणे नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या 195 संत महाराज मंडळींना विठ्ठलाचं मुखदर्शन घेता येणार आहे. तर पौर्णिमेलाच काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.

कोण आहेत तुषार भोसले ?

तुषार भोसले हे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील ते आचार्य आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आचार्य पदवीबाबतही मोदी यांच्याप्रमाणेच शिक्षणावरून वाद झाला होता. तुषार भोसले यांचं खरं नाव तुषार शालीग्राम पितांबर असल्याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे . ते बहुजन समाजाचे नसून ब्राह्मण असल्याच्या चर्चाही मधल्या काळात रंगल्या आहेत मात्र समाजाला आपले नेतृत्व बहुजन समाजातील वाटावे म्हणून त्यांनी भोसले आडनाव धारण केले आहे अशी सोशल मीडियात चर्चा आहे जसे मनोहर भिडे यांनी देखील स्वतःचे नाव संभाजी भिडे असे केलेले आहे.

भारतीय विद्याभवनने तुषार भोसले यांना 2012 रोजी अद्वैत वेदांतात शास्त्री ही पदवी दिली. 2014 मध्ये त्यांना आचार्य ही पदवी मिळाली. त्यांनी या दोन्ही पदव्या अध्ययन करून मिळविल्या असल्याचे त्यांचे नजीकचे लोक सांगतात. ते कीर्तनकार, प्रवचनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीत दाखल झाल्यावर सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करत असतात. हिंदू हिंदू करत धर्माचा बागुलबुवा पुढे करून बिगर भाजप राज्यातील सरकारवर टीका करणे, हाच त्यांचा उद्योग सुरु असून भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील गोष्टींवर मात्र ते कधी बोलताना दिसले नाहीत त्यामुळे त्यांच्याच एकतर्फी भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे .

अजित पवारांनी याआधीच घेतलाय समाचार

कोरोना प्रादुर्भाव असताना देखील यंदा वारीत खंड पडू न देता वारीला परवानगी देण्याची मागणी भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल करण्यात आला. तेव्हा कोण आहेत तुषार भोसले ? असा सवाल करून अजितदादांनी तुषार भोसले यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तुषार भोसले हे भाजपाच्या आध्यात्मिक आघाडी प्रमुख असून गेल्या काही दिवसांपासून वारी झालीच पाहिजे यासाठी आक्रमक राहिलेले दिसत आहेत. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून भाजपकडून मात्र वारीचे निमित्त पुढे करून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे . जनमानसाचा कौल देखील भाजपच्या विरोधातच दिसत असून आताच कुठे दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली असल्याने नवीन धोका नको, असे बहुसंख्य लोकांचे देखील मत आहे.

अजितदादा हे पुण्यात आले होते त्यावेळी तुषार भोसले यांनी वारीबाबत सरकारला इशारा दिल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी कोण आहेत तुषार भोसले ? असा सवाल पवारांनी केला. त्यावर ते भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख असल्याचं सांगण्यात आलं. त्यावर, कोणत्याही राजकीय व्यक्तीने काही सांगितलं तर ते कितपत गांभीर्याने घ्यायचं ते वेगळं आहे. आम्ही सर्वांनी वारकरी संप्रदायाशी चर्चा केली आहे. कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे त्यांना निर्बंधांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे, असं पवार म्हणाले.


शेअर करा