एका मामाच्या मुलीशी लग्न तर दुसऱ्या मामाच्या मुलीशी लफडं, मात्र त्यानंतर..

एका मामाच्या मुलीशी लग्न करून काही दिवसांनी दुसऱ्या मामाच्या मुलीला प्रेमसंबंधातून पळवून नेल्यानं मामानं आपल्या भाच्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाना लोखंडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेह कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यात आढळला आहे. मामानेच आपल्या भाच्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून पोलिसांनी आरोपी मामासह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

नाना लोखंडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील खिलारवाडी येथील रहिवासी आहे. मृत नाना लोखंडे हा बांधकाम साइटवर सेंट्रींगचं काम करत होता. त्याचबरोबर त्याचा पानपट्टीचा व्यवसायही होता. 22 जून रोजी मृत नाना अचानक घरातून गायब झाला होता. त्याच्या मोबाइल सातत्यानं फोन केले, जवळच्या मित्रांकडे आणि नातेवाईकांकडे चौकशी करूनही त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी जत पोलीस ठाण्यात नाना लोखंडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलीस तपास करत असताना कर्नाटक राज्यातील विजापूर याठिकाणी एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. संबंधित मृतदेह नाना लोखंडेचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी अवघ्या काही तासांतचं हत्येचं गूढ उलगडलं आहे. साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मृत नाना लोखंडे याच्या मामासह तीन जणांना अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत नाना लोखंडे याचं काही दिवसांपूर्वी आपल्याा एका मामाच्या मुलीशी लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी त्याचं दुसऱ्या मामाच्या मुलीवर प्रेम जडलं. प्रेमसंबंधातून त्यानं दुसऱ्या मामाच्या मुलीलाही पळवून नेलं. यामुळे संतापलेल्या मामाचा आणि मृत नानाचा वादही झाला होता. याच वादातून मामानं आपला भाचा नाना लोखंडे याच्या हत्येचा कट रचला. त्यानं आपल्या काही मित्रांच्या मदतीनं नानाची हत्या केली. आणि त्याचा मृतदेह कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात नेवून टाकला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.