धोका वाढला..राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे आणखी ‘ इतके ‘ रुग्ण वाढले

  • by

 5 total views

कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत असले तरी नव्यानं उदयास आलेल्या डेल्टाप्लस व्हेरियंटमुळे (Delta Plus Variant) संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ वेगाने पसरत आहे. आठवडाभरात १४ डेल्टा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३४ वर गेला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी केली जाते. मध्य प्रदेशातून तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांमध्ये आणखी तीन डेल्टा प्लस संक्रमित आढळले आहेत.

आतापर्यंत डेल्टा प्लसचे रुग्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तमिळनाडू, पंजाब, केरळ, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिसा, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमध्ये मिळाले आहेत. दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशातही नवा प्रकार असण्याची शक्यता आहे. सद्यस्थिती दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्ण कमी होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत डेल्टाचे ८६ टक्के रुग्ण आढळून येत आहेत.

राज्यात आज २३१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. २३१ मृत्यूंपैकी १५६ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ७५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. मृतांचा एकूण आकडा १,२१,८०४ वर पोहोचला आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये कोल्हापूर ४५, औरंगाबाद २५, सातारा २४ येथे सर्वाधिक मृत्यू झाले. मृत्यूचा दर वाढून २.०१ टक्के झाला आहे. ८६२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात सध्या १,१७,०९८ सक्रिय रुग्ण आहेत.