आज ‘ डॉक्टर्स डे ‘ च्या निमित्ताने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना लिहिलेलं पत्र जशास तसं

शेअर करा

कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या काळात डॉक्टरांनी प्राण पणाला लावून रुग्णांची आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सेवा केली. हजारो जीव वाचवले, लाखो जणांना बरं केलं. आज डॉक्टर डे निमित्त राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यातील डॉक्टरांना पत्र लिहिलं आहे. सर्व डॉक्टरांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना त्यांच्या कार्याला देखील आरोग्यमंत्र्यांनी सलाम केला आहे. आरोग्यमंत्र्यांच्या या पत्राची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे .

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना लिहिलेलं पत्र जशास तसं…

माझ्या प्रिय डॉक्टर मित्रांनो,
राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. गेल्या दीड वर्षापासून कोरोना विरुद्ध लढाईत आपण अहोरात्र मेहनत करून सामान्यांना जीवदान देण्याचा काम करीत आहात. आपल्या कार्याला माझा सलाम… खरं म्हणजे आपल्या कौतुकासाठी शब्द कमी पडावेत असे काम आपण करत आहात… योगायोग म्हणजे आज 1 जुलै….. महाराष्ट्रात कृषी दिन देखील साजरा केला जातो… कोरोनाच्या या कठीण काळात अन्नदाता शेतकरी आणि जीवनदाता डॉक्टर यांच्या कष्टामुळे सर्वसामान्यांना हा कठीण काळ सुसह्य होण्यासाठी मोठी मदत मिळाली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सोबतच बळीराजालाही मी शतशः धन्यवाद देतो डॉक्टरांचा असा एक दिवस असू नये, कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का? तो दररोज आपल्याला हवा असतो…

आपण सारेजण दीड वर्षापासून कोरोनाला हरवण्याचा ध्येयाने लढतो आहोत… आपल्या सोबत आरोग्य कर्मचारी, पोलिस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत… या सर्वांच्या प्रयत्नांमुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यात यश येत आहे…

राज्यात पहिला लाटेनंतर दुसरी लाट भीषण स्वरुपाची आली… डॉक्टर तुम्ही सर्वांनी या गंभीर परिस्थितीत नागरिकांना उपचार दिले… त्यामुळे हजारोंचे प्राण वाचले… आपण जीवनदाते आहात… मात्र काही वेळा शोकमग्न नातेवाईकांकडून भावना अनावर झाल्यास आपल्यावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना घडतात त्याचे समर्थन नक्कीच करता येणार नाही… अशा घटना निंदनीय आहेत… जो आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याच्या प्राणाचे रक्षण करतो त्याच्या जिविताची हानी होईल असे कृत्य कोणीही करू नये असे आवाहन या निमित्ताने मी करतो…

कोणाच्या काळात सामान्यांना उपचार देताना काही डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो… राजय सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सोपवताना संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे… यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आज राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्‍क्‍यांवर गेला आहे… याकामी डॉक्टर्स त्यांच्या जोडीला असलेल्या नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांचा मोठा वाटा आहे… आजच्या डॉक्टर दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व डॉक्टरांना मी पुन्हा एकदा खूप सार्‍या शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो

आपला राजेश टोपे
आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य


शेअर करा