ब्रेकिंग..गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या कार्यालयावर हल्लाबोल , कुठे घडली घटना ?

शेअर करा

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत. कारण गोपीचंद पडळकर समर्थकांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. एकच छंद, गोपीचंद अशा घोषणा देत, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. पडळकर समर्थकांनी राष्ट्रवादीच्या सोलापुरातील कार्यालयावर हल्ला चढवला आहे .

दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्या प्रकरणात दोन अज्ञात आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या महितीनुसार या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून पोलीस पथकामार्फत त्यांचे शोध कार्य सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्याने गाडीवर दगडफेक केली तो 25 वर्षांचा तरुण आहे. त्याचे शिक्षण बीए पर्यंत पूर्ण झालेले आहे. सोलापुरातील एका शाळेत लॅब असिस्टंट म्हणून काम करतो.

हल्लेखोर तरुण हा स्वतः धनगर समाजातून असून समाजातील विविध प्रश्नांवर त्याने याआधी आवाज उचलला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच सरकारच्या विरोधात त्याने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केल्याची माहिती देखील पुढे येत आहे. मात्र गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यामागे नेमके काय कारण असेल हे अटकेनंतर समजेल.

रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांना ठणकावले

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरील पडळकरांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मोठ्या नेत्यावर कुणी असं वक्तव्य करत असेल तर एखाद्या युवकाला ते चुकीचं वाटलं असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी पडळकरांच्या गाडीवरील दगडफेकीबाबत दिली आहे .

सोलापुरात त्या युवकाने जे केलं ते चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. मात्र, त्यामागील विचारही समजून घेणं महत्वाचं आहे. जे भाजप नेते पडळकरांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी सांगावं की जे वक्तव्य पडळकरांनी केलं ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतं का? असा सवालही रोहित पवार यांनी केलाय. पडळकर यांना जी आमदारकी दिली गेलीय ती फक्त पवारांवर टीका करण्यासाठी देण्यात आलीय. पडळकर अशी टीका करतात की त्याचं उत्तरही देता येत नाही. कारण त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल, असा खोचक टोलाही रोहित पवारांनी लगावलाय. दोन दगडं एकमेकांवर आदळली तर आगच पेटेल, त्यापेक्षा न बोललेलं बरं, असंही रोहित पवार म्हणाले.

शरद पवारांवर पडळकरांनी नक्की काय टीका केली होती ?

पवार कुटुंबीयांवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं होत . ‘शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे,’ अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली होती.

ओबीसींच्या संदर्भात इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं होतं, मात्र राज्य सरकारनं ते केलं नाही, असा आरोपही पडळकरांनी केला होता . ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे, म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, असंही ते म्हणाले. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्दयावरुन भांडतो, असंही ते म्हणाले होते.

‘महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजा-समाजमध्ये तेढ वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. मूठभर लोक बहुजनांचा आवाज दाबत आहेत. ओबीसींना दिलेले घटनात्मक अधिकार हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ओबीसीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला होता.

‘धोक्यानं जे सरकार आलं, त्या सरकारमध्ये ओबीसी का उपमुख्यमंत्री झाला नाही? धनंजय मुंडे किंवा अमोल कोल्हे हे का प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत, हे ओबीसी का समोर आले नाहीत? सरकार नसताना ओबीसींसाठी आंदोलन करण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले, मात्र मंत्रिपदासाठी अजित पवार पुढे आले, असा हल्लाबोल पडळकरांनी केला. ‘ओबीसी आमदारांची संख्या भाजपमध्येच सगळ्यात जास्त आहे,’ असा दावाही त्यांनी केला होता.

दिल्लीत शरद पवार यांच्या पुढाकारानं झालेल्या राष्ट्र मंचाच्या बैठकीची पडळकरांनी खिल्ली उडवली होती . ‘तिसऱ्या आघाडीसाठी झालेली बैठक म्हणजे ‘रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात’ अशातला प्रकार आहे. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा आहे, असा चिमटाही पडळकर यांनी पवारांना काढला होता.

भाजपने पडळकरांना आमदार केले ह्या ‘ एकमेव ‘ निकषावर

भाजप आमदार पडळकर नुकतेच जामखेड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर आरोप केले होते. रोहित पवार सेलिब्रिटी, मुख्यमंत्री असल्याच्या थाटात वावरत असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर पवार आज कर्जत येथे आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे .

रोहित पवार म्हणाले ,‘ पवार कुटुंबीयांवर टीका करून ज्यांना आमदारकी मिळाली आहे आणि त्याच निकषावर ती अवलंबून आहे, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजत नाही. तरीही पडळकरांना याचा साक्षात्कार कसा झाला, याचा खुलासा त्यांनीच करावा,’ असे आवाहन देखील पवार यांनी आपल्यावरील टीकेला दिले आहे .

रोहित पवार म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या सर्वांचे मी नेहमी स्वागत करतो. पडळकर बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत, असे बोलले जाते. मग ज्या भाजपने मंडल आयोग लागू करण्यास कडाडून विरोध केला, त्या पक्षात ते कसे आहेत? त्यांच्या पक्षाची मंडल आयोगाची भूमिका त्यांनी आधी जाहीर करावी. सांगलीमध्ये त्यांचे एक भाषण खूप गाजले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते. जग इकडचे तिकडे झाले तरीही मी भाजपमध्ये जाणार नाही. मग आता ते भाजपमध्ये कसे गेले ?’

ज्येष्ठ नेते शरद पवार आणि कुटुंबीयांवर सतत टीका केल्यामुळेच पडळकर यांना भाजपने आमदारपद दिले आहे. त्यांच्या याच कामगिरीवर ते अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. मात्र, त्यांनी सतत टीका करण्यापेक्षा कधी तरी विकास कामांवर बोलावे. त्यांनी स्वत:ही काय विकास केला, हेही सांगावे. मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजत नाही. तरीही पडळकर तसे म्हणत असतील तर त्यांना हा साक्षात्कार कसा झाला, हे त्यांनीच स्पष्ट करावे.

मी आजही स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा छोटा कार्यकर्ता असल्याचे समजतो. आजही कार्यकर्ता आहे, उद्याही कार्यकर्ता राहणार आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो. यामुळे जनता ठरवते कोण कोणत्या पदावर योग्य आहे. त्यामुळे मी स्वतःला कोणीही समजत नाही, ते काय समजतात ते माझ्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नाही. त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रश्न सोडवून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्लाही पवार यांनी पडळकरांना दिला.


शेअर करा