प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबाकडून सुनेचा अमानुष छळ, पतीने दिले सिगारेटचे चटके आणि म्हणाला..

  • by

 6 total views

उच्च शिक्षित सुनेला सिगारेटचे चटके देऊन मारहाण करुन छळ करणार्‍या उद्योजक पती व कुटुंबातील तिघांसह ८ जणांवर चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक हिंसाचार, गंभीर मारहाण, धमकावणे, फसवणुक करणे अशी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती गणेश नानासाहेब गायकवाड (वय ३६), नानासाहेब शंकरराव गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड (तिघे रा.औंध) सोनाली दीपक गवारे , दीपक निवृत्ती गवारे (दोघे रा. जेएम रोड), दीपाली वीरेंद्र पवार (रा. औंध, पुणे) भागीरथी पाटील (रा. औंध), राजु अंकुश (सध्या रा. सांगवी, मुळ रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २७ वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. ही घटना २३ जानेवारी २०१७ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

पीडित विवाहिता सांगोला तालुक्यातील प्रतिष्ठित घराण्यातील आहे. त्यांचा गणेश गायकवाड यांच्याशी विवाह झाला होता. तेव्हापासून दागिने आणि हुंड्याच्या कारणावरुन पिडीतेला सातत्याने त्रास दिला जात होता. लग्नाची चांदीची भांडी व देवपुजेचे साहित्य, पिडितेचा पासपोर्ट, पदवी प्रमाणपत्र, पॅनकार्ड आणि इतर महत्वाची कागदपत्रेही गणेश याने तिला त्रास देण्याच्या हेतूने फसवणूक करुन सुस गावातील फार्म हाऊसवर लपवून ठेवली आहे, असा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. 

पती गणेश याने तिला मारहाण करताना कानावर मारल्याने तिचा उजवा कान पूर्णपणे बधीर झाला असून तिला ऐकू न येण्याचा त्रास सुरु झाला आहे, असे देखील पीडित महिलेचे म्हणणे आहे.

गायकवाड कुटुंब हे औंध परिसरातील प्रतिष्ठीत कुटुंब आहे. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. गणेश हा दारु पिऊन पत्नीचा छळ करत होता. तिला त्याने सिगारेटचे चटकेही दिले. तसेच मला तुझी गरज नाही. मला भरपूर अ‍ॅटम आहेत, असे म्हणून तिचा मानसिक छळही करत होता, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करीत आहेत.