सर्वात मोठी बातमी..भाजपचे तब्बल ‘इतके ‘ आमदार वर्षभरासाठी निलंबित, वाचा नावे

शेअर करा

पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत सुरू झालेल्या चर्चेचं पर्यवसान आधी शाब्दिक वादात, आरोप-प्रत्यारोपात, नंतर गदारोळात आणि पुढे अक्षरशः राड्यात झालं. शेवटी, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षाच्या निलंबनाच्या कारवाई करण्यात आली. त्यात आशिष शेलार, गिरीश महाजन यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्ष यांच्याबरोबर धक्काबुक्की आणि शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षातील १२ आमदारांचे १ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजपा आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आला.

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

या आमदारांचं झालं निलंबन

१) गिरिश महाजन
२) संजय कुटे
३) अभिमन्यु पवार
४) आशिष शेलार
५) पराग आळवणी
६) योगेश सागर
७) राम सातपुते
८) नारायण कुचे
९) अतुल भातखळकर
१०) बंटी भागडिया
११) हरिष पिंपळे
१२) जयकुमार रावल

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते, असं सांगतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतिला हे शोभणारं नाही. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं, अशा शब्दात तालिका सदस्य भास्कर जाधव यांनी विरोधकांचे कान उपटले.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरील चर्चे दरम्यान झालेल्या घटनेचा तपशील दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात ताणतणाव होत असतात. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. पण एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं तर विषय तिथेच संपतो. मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो. आपण साधनसुचितेच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो, पण आपण कसं वागतो?, असा सवाल करतानाच विधानसभा अध्यक्षांनी मला खुर्ची बसायला दिली. मी बसलो नाही. कारण मी अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही म्हणून मी बसलो नाही. त्यानंतर फडणवीस आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली. चंद्रकांत पाटलांना खुर्ची दिली, याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.

विरोधकांचा गोंधळ सुरू होता. विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. हे आमदार घुसले तर घुसले, ते गावगुंडांप्रमाणे अंगावर तुटून पडत होते. तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं. पण विरोधी पक्षनेते त्यांना आवरायला तयार नव्हते. आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय, असं विरोधी पक्षनेते म्हणाले, असं त्यांनी सांगितलं.

ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत, असे आदेश जाधव यांनी दिले. मी जर एकही असंसदीय शब्द बोललो असेल किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे. तुम्हाला जी शिक्षा होईल ती मी घेईल. मी आक्रमक आहे. पण कधीच असंसंदीय शब्द वापरला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यात काळा दिवस आहे, असंही ते म्हणाले. झाल्याप्रकारबद्दल आशिष शेलार यांनी माझी माफी मागितली आहे. फक्त त्यांनीच दोन-तीन वेळा माझी माफी मागितली. हे म्हणजे आधी लाथ लावायची आणि मग सॉरी म्हणायचं असा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.


शेअर करा