ट्रॅफिक पोलिसाने केली पैशाची मागणी करताच नागरिकाने कपडे काढून दिले आणि म्हणाला…

शेअर करा

ट्रॅफिक पोलीस आणि वाहनचालक यांचा वाद तसा जुनाच आहे. बरेचदा या वादातून भांडण, हाणामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत.राज्यात काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही पोलिसांसोबत नागरिकांचा वाद होतच असतो. सध्या सोलापूरातील असाच एक ट्रॅफिक पोलीस आणि एका नागरिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोनामुळे आधीच लोकांचे अर्थचक्र बिघडलेले असताना पोलिसांकडून वसुली केली जात असून चक्क अवैधरित्या वसुली करण्याचे देखील प्रकार उघडकीस आलेले आहेत .

सोलापूर शहरात गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाकडे ट्रॅफिक हवालदाराने पैशांची मागणी केली होती. पीडित दुचाकीस्वाराने चक्क मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे गांधीगिरी करत अंगावरील सगळे कपडे उतरून पोलिसाच्या हवाली केले .सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरातील पत्रकार भवन येथे हा प्रकार घडला आहे. वाहतूक पोलिसाने अडवून पैशांची मागणी केल्याने पोलीस आणि या नागरिकामध्ये शाब्दीक वाद झाला. पीडित व्यक्तीने अंगावरील कपडे काढून रस्त्यावरच नग्न झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर मात्र हा पोलीस शिपाई तेथून पळून गेला.

शहरातील गॅस गोडावूनमधून संबंधित व्यक्ती गॅस सिलेंडर घेऊन घराकडे जात असताना वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वारास हटकले व मास्क नसल्याचे सांगत पैशांची मागणी केली त्यावर मास्क घालेन नाहीतर कपडे काढून फिरेन तुम्हाला काय करायचंय, असा प्रतिप्रश्न व्यक्तीने केला. त्यावेळी पोलिसाने देखील उलट उत्तर देत कपडे काढा नाहीतर काहीही करा, पण मास्क नसेल तर पावती फाडा, अशी भूमिका घेतली . त्यानंतर संबंधित व्यक्ती कपडे काढून नग्नावस्थेत रस्त्यावर उभा राहिला.

पोलिसांची बदनामी होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन सत्यता पडताळण्यात येईल. संबंधीत रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडेही चौकशी करण्यात येत आहे. वाहतूक पोलीसाने चौकशीत अवैधरित्या पैशांची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी म्हटले आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वाराने मास्क घातला नव्हता आणि दंडाच्या रकमेची मागणी केल्यानंतर उद्धट वर्तन केल्याचे सांगण्यात आले आहे, असेही धाटे यांनी म्हटले.


शेअर करा