भाजपला इशारा..प्रीतम मुंडेंना डावलल्यामुळे बीडमध्ये आतापर्यंत तब्बल ‘ इतके ‘ राजीनामे

शेअर करा

केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. आज जिल्ह्यात 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आणखी चिघळला असून प्रीतम मुंढे यांच्या समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे .

‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अंतर्गत गटबाजीला पक्षात स्थान नसल्याचे स्पष्ट केले होते मात्र तरीही आज राजीनामा सत्र सुरु झाले आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत भाजपच्या विविध 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.दोन दिवसात तब्बल 14 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.

पंकजा मुंढे काय म्हणाल्या होत्या ?

‘ गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते तेव्हा मी पायाला पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला. मी राजकारणात जी आले ते व्यवसाय म्हणून नाही तर राजकारणाचं व्रत घेऊन आले. माझ्या पित्याचा अचानक मृत्यू झाला. त्या मृत्यूनंतर बिथरलेला हा सगळा समाज प्रचंड संतप्त होता, त्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर होतं. ह्या समाजाला एका ठिकाणी आणणं माझ्यासाठी चॅलेंज होतं. मुंडे साहेबांनी पन्नास चाळीस वर्ष एक ठिकाणी आणून ही घडी बसवली होती. त्या घडीला विस्कटू देऊ नये एवढी माझी साधी जबाबदारी. ती जबाबदारी पार पाडतेय ‘ असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितले होते .

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. खातेवाटप झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना अभिनंदनाचं ट्वीट न केल्यामुळं या चर्चांना अधिक बळ मिळालं होतं. या सर्व चर्चांनंतर पंकजा मुंडे यांना डावलण्यात येण्याची चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत होती. या सर्व चर्चांवर आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं होत .

‘ प्रीतम मुंडेंनी दोनदा खासदारकीची निवडणूक जिंकूनही त्यांना डावलण्यात आलं का ?, या प्रश्नांवर उत्तर देताना पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसोबतची आठवण सांगितली. प्रीतम मुंडे वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळं त्या भरघोस मतांनी जिंकणारच होत्या. पण आत्ता जी निवडणुक झाली त्या निवडणुकीत त्या स्वतःच्या मेरिटवर जिंकल्या तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते,’ अशी खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली होती .

‘खासदारकीची शपथ घेण्याआधीच गोपीनाथ मुंडेंचे अपघाती निधन झाल. मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला गेले. हे केवढं मोठं घोर दुःख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या,’ असं सांगतानाच गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींनी त्यांना गहिवरून आलं होत.

केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात नुकताच अनेक नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार व डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व बीडमध्ये मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेल्या प्रीतम मुंडे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी चर्चा होती मात्र प्रीतम यांना संधी मिळाली नाही.

प्रीतमताईंचं नाव होतं ते योग्य होतं. असं नाही की ते अयोग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही तर त्या विक्रमी मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी पक्षाचं काम केलं आहे. त्यांनी कोणतीही बैठक बुडवली नाही. त्या नेहमी सक्रिय राहिल्या, त्या कष्टाळू आहेत. हुशार आहेत. महिला आहेत. तरुण आहेत. बहुजन चेहरा आहे. त्यामुळे त्यांचं नाव न येण्यासारखं त्यामध्ये काही नाही आहे. अनेक लोकांची नावं चर्चेत होती. त्यांची नावं आली नाही. पक्षाने एखादा निर्णय घेतला. चर्चा ही त्या नावाच्या वलयामुळे होत आहे. त्यामुळे त्याला विराम द्यावा, असं आवाहन पंकजा मुंढे यांनी केलं आहे .

राजकीय पुनर्वसन या शब्दावर देखील पंकजा मुंढे यांनी चांगलेच तोंडसुख घेताना, ‘ राजकीय पुनर्वसन हा शब्दच मला मान्य नाही. मी काही पूरग्रस्त नाही. माझं घर वाहून गेलेलं नाही किंवा मी आश्रितही नाही, जो बरबाद झालाय. ज्याचं सगळं वाहून गेलंय. माझ्या बाबतीत तसं काहीही झालेलं नाही ‘ सांगत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आपली भूमिका मांडली होती .

पक्षातील मूळ लोकांना बाजूला करून बाहेरून आलेल्यांना पदं दिली जात आहेत याविषयी विचारलं असता, बाहेरून आलेल्या लोकांमुळं पक्षाला फायदा होतोय असं पक्षाला वाटत असेल. तसा पक्षातील नेत्यांचा अनुभव असेल. तसं असेल तर चांगलं आहे. नव्या मंत्र्यांना मी स्वत: शुभेच्छा दिल्या आहेत. कोणीही मोठं झालं तर त्याच्यापुढं लहान वाटावं इतक्या कोत्या मनाचे आम्ही नाही. पक्षामध्ये जे नवीन आलेत त्यांचंही स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळालंय त्यांचंही स्वागत आहे आणि या नव्या लोकांमुळं भाजपचं एक मतही वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे,’ असं पंकजा म्हणाल्या.

मंत्रिमंडळ विस्तारात टीम देवेंद्रला स्थान देण्यात आलं आहे. त्यावर त्यांना विचारण्यात आलं. त्यावर टीम देवेंद्रमध्ये कोण आहे आणि टीम नरेंद्रमध्ये कोण आहे हे मला माहीत नाही. पक्षालाही अशा टीम मान्य नाहीत. आमच्याकडे राष्ट्र प्रथम, पक्ष द्वितीय आणि मी तृतीय असतो. आमच्याकडे मीपण मान्यच नाही. आमच्या संस्कृतीत ते बसत नाही. आमच्याकडे आपण आपण, आम्ही आम्ही चालतं. त्यामुळे पक्षात कोणती टीम आहे, असं सांगत त्यांनी राज्यातील गटातटावर देखील निशाणा साधला.

ओबीसींचं आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित झाल्याशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नयेत. तो ओबीसींवर घोर अन्याय होईल. ओबीसी आरक्षणाबाबत सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. सरकारने तात्काळ पावलं उचलून हे थांबवणं आवश्यक आहे. या पोटनिवडणुका आहेत. मुख्य निवडणुकांच्या आधी तरी सरकारचा इम्पिरीकल डेटा आणि त्याचा अभ्यास होणं हे शंभर टक्के अपेक्षित आहे, असं पंकजा म्हणाल्या


शेअर करा