‘ या जीवनाला अर्थ नाही ‘ पुण्यात इंजिनीअर तरुणाची आत्महत्या

शेअर करा

कोरोनानंतर लोकांची मानसिक स्थिती ढासळत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत आणि त्यातून अनेक आत्महत्या देखील झाल्या आहेत. पुण्यात जर्मनस्थित नामांकित कंपनीमध्ये संगणक अभियंता असलेला तसेच गिर्यारोहक असलेल्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डेक्कन परिसरात बीएमसीसी रस्ता येथे ही घटना घडली असून मानसिक तणावातून हा प्रकार केला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अक्षय सुधीर देवधर (वय ३६, रत्नाली अपार्टमेंट, बीएमसीसी रस्ता, डेक्कन) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अक्षय हा मुळचा मुंबई येथील आहे, त्याचे आई-वडिल मुंबईला राहतात तर अक्षय इंग्लैंड येथे शिक्षण घेत होता. तेथेच तो नोकरी करीत होता. मात्र काही महिन्यापूर्वी तो पुण्यात आला होता. डेक्कन येथील बीएमसीसी रस्ता परिसरातील रत्नाली अपार्टमेंटमध्ये त्याच्या आजोबांची सदनिका होती. त्यामध्ये तो एकटा राहात होता आणि घरुनच त्याच्या कंपनीचे काम करीत होता.

गुरुवारी अक्षय फोनला प्रतिसाद देत नव्हता त्यामुळे त्याचे नातेवाईक त्याच्या घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले.यामुळे नातेवाइकांनी डेक्कन पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अग्निशामक दलास खबर दिली. अग्निशामक दलाने दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी अक्षयने गळफास घेतल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यास ससून रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.अक्षयच्या मृत्युचे कारण अजुन समजले नाही .अक्षयने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली नाही, मात्र त्याच्या डायरीमध्ये “या जीवनाला अर्थ नाही” असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले आहे.


शेअर करा