पुण्यात महिला डॉक्टरच्या बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावणारा ‘ अखेर ‘ धरला , आरोपीही सुशिक्षितच

शेअर करा

पुण्यातील एका नामांकित विद्यापीठातील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरच्या घरात छुपे कॅमेरे शहरातील एका एमडी डॉक्टरने लावले असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी त्या एमडी डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. आरोपी डॉक्टर हा भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात लेक्चर घेण्यासाठी देखील जात होता. डॉक्टरचा असाही कारनामा उघड झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडालेली आहे .

पुण्यातील एका नामांकित विद्यापीठातील स्टाफ क्वॉर्टरमध्ये राहणाऱ्या महिला डॉक्टरच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये अज्ञाताने छुपे कॅमेरे लावल्याची धक्कादायक घटना सहा जुलैला उघडकीस आली होती. त्या प्रकरणी महिला डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले असून सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांचा हिराबाग येथे मोठा दवाखाना आहे.

आरोपीने हे छुपा कॅमेरा असणारा बल्ब इ-कॉमर्स वेबसाइटवरून मागवला असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडे फिर्यादीच्या घराच्या कुलुपाची बनावट चावी होती. त्या चावीच्या सहाय्याने आरोपीने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून, छुपे कॅमेरे असणारे बल्ब लावले होते. त्याचा यामागे हेतू सदर महिलेवर पाळत ठेवणे हा होता की अन्य काही ? याचा तपास सुरु आहे .

काय आहे प्रकरण ?

पुण्यातल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली होती . परिसरातील एका नामांकित विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळून आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .

नेमका कोणी आणि कशासाठी हा प्रकार केलाय ? याबाबत फिर्यादी महिलेला कुठलीच माहिती नसल्याचं तिने पोलिसांना सांगितले. तक्रारदार डॉक्टर एका विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या डॉक्टर्स कॉर्टरमध्ये राहतात. सहा जुलै रोजी त्या सकाळी 8:80 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटले, त्यानंतर त्यांनी घराच्या प्रत्येक लोकेशनची झाडून तपासणी केली तेव्हा हा प्रकार लक्षात आला.

बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या घाबरून गेल्या आणि त्यांनी संबंधित प्रकार मैत्रिणींना सांगितल्यावर या प्रकाराचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. त्या घरी नसताना त्यांच्या परस्पर कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेवण्याचे हिशोबाने घरात स्पाय कॅमेरे लावल्याचं त्यांच्या लक्षात आलं होत.

डॉक्टरच्या घरी अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचे बाथरूम, बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले होते. त्यानंतर हळूच दरवाजा लावून घरातल्या सगळ्या गोष्टी आहेत अशा ठेवून निघून गेला. मात्र जेव्हा ही महिला डॉक्टर आपल्या कामावरून घरी परत आली तेव्हा त्यांना घरात काही गोष्टीत संशयास्पद वाटल्या आणि हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली होती मात्र आता आरोपीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे .


शेअर करा