शिरूरच्या स्मशानभूमीत ‘ अजब ‘ प्रकार , नागरिक धास्तावले

शेअर करा

महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात शिरुर तालुक्यातील पाबळ येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे . अघोरी विद्येचा हा प्रकार असून परिसरातील नागरिक ही घटना उघड झाल्यानंतर चांगलेच धास्तावलेले आहेत याशिवाय गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा प्रकार चर्चेला कारण ठरला आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी नंदिनी जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

नक्की प्रकरण काय आहे ?

पाबळ येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा एका काळ्या पिशवीवर कोहळ्याचा भोपळा ठेवण्यात आला आहे. कोहळ्याचा खालचा भाग काळ्या पिशवीत आहे. या कोहळ्याला टाचणी टोचून एका मुलीचा फोटो लावण्यात आलेला आहे. स्मशानभूमीत कोहळ्यावर मुलीचा फोटो लावून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाबळमधील स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी सुरू असताना नागरिकांचे याकडे लक्ष गेले आणि ही घटना समोर आली.

संबंधित प्रकरणावर अद्याप तरी कोणतीही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी कारवाई करण्याचं ठरवलं तर हा अघोरी प्रकार नेमका कोणी केला? याचा तपास करावा लागेल. कोहळ्यावर फोटो नेमका कोणत्या मुलीचा आहे? याची माहिती कदाचित पोलिसांना मिळू शकते. पण तो कोहळा तिथे कोणी ठेवला याची माहिती मिळवणं हेच पोलिसांच्या पुढील आव्हान आहे .

अवघ्या दोन दिवसांपूर्वी बुलडाण्याच्या एका स्मशानभूमीतही अघोरी प्रकार उघड झाला होता. मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली, असा त्याचा समज असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून आशिष गोठी याने शुक्रवारी (9 जुलै) रात्री 9 वाजेच्या सुमारास तीन मांत्रिक स्मशानभूमीत पाचारण केले. मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार सुरु असल्याने नागरिकांमध्ये ह्या घटनेची जोरदार चर्चा सुरु झाली.

नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली. मात्र या प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला. तब्बल दोन तास मांत्रिकांचे प्रेतांसोबत संभाषण सुरु होते, असा दावा केला जातोय. संबंधित प्रकार असंख्य नागरिकांनी बघितला. मात्र भीतीपोटी कुणी पुढे जाण्यासाठी धजावलं नाही. अखेर या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी तीनही मांत्रिक आणि आरोपी आशिष गोठी याला अटक केली होती


शेअर करा