‘ .. त्यावरून त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत आहे ‘

  • by

 3 total views

विरोधी पक्षातील राजकीय व्यक्तींना पशू-पक्ष्यांची नावे देणे ही भाजपचीच संस्कृती आहे, अशी खोचक टीका करतानाच भाजपकडून विरोधी पक्षाला हिणवलं जाणं जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे .

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना पक्ष्यांची उपमा दिली होती. त्याला नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपमध्ये विरोधी नेत्यांना पशू पक्ष्यांची उपाधी देण्याचा धंदा सुरू आहे. कधी भाजपचे अमित शहा विरोधी पक्षांच्या लोकांना साप, विंचू, तर कधी कुत्रा बोलत आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना पक्ष्यांची उपमा देत आहेत यावरुन त्यांची सवय आणि संस्कृती समोर येत आहे. भाजप जनतेला पशू-पक्षी समजत आहे. जनता हे कधीच सहन करणार नाही. भाजपचं जे काही चालंलय ते जास्त दिवस चालणार नाही “, असं मलिक म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी मलिक यांनी भाजपवर टीका केली होती. नारायण राणे हे कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या परेल येथील एका इमारतीला ईडीने नोटीस दिल्याच्या बातम्या भाजपने पेरल्या होत्या. याशिवाय नारायण राणे अमित शहा यांना अहमदाबाद येथे भेटून आल्याचा व्हिडीओ राणे यांनी नकार दिल्यावर भाजपच्या लोकांनी व्हायरल केला होता. त्याचपध्दतीने बंगालमध्ये भाजपने लोक घेतले होते. म्हणजे ईडी, सीबीआय व इतर यंत्रणांच्या दबावाखाली आमच्या पक्षात या अशी परिस्थिती भाजप निर्माण करत आहे. त्यांच्या पक्षात गेल्यावर चौकशा बंद होतात. ही सत्य परिस्थिती आहे. नितीन गडकरीही वाल्या कोळयाचा वाल्मिकी करण्याची ताकद भाजपमध्ये असल्याचे बोलले होते याची आठवण नवाब मलिक यांनी करून दिली होती.

शरद पवारांनाही ईडीची नोटीस आली होती मात्र ती परत घेण्यात आली. 2019 मध्ये राष्ट्रवादीने ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढाई केली. त्यामुळे आमचे नेते किंवा कार्यकर्ता अशा नोटीसीला आणि कारवाईला घाबरणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता. आमचे नेते ज्या एजन्सीने कारवाई केलीय त्यांना सहकार्य करत आहेत. आमच्या नेत्यांनी चुकीचं काही केलेलं नाही. मात्र केंद्रीय एजन्सीचा दुरुपयोग केला जातोय. या चौकशा थांबवा हे सांगण्यासाठी आमचा कोणताही नेता मोदी-शहा यांची भेट घेत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं होतं