अधिकारी होताच ‘ गुण ‘ दाखवायला केली होती सुरुवात मात्र …

  • by

 5 total views

गेल्याच वर्षी प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या एका तरुण अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. एका गरीब कुटुंबातून संघर्ष करत त्यानं प्रशासकीय सेवेत नोकरी मिळवली होती पण अधिकारी झाल्यानंतर त्याला पैशाचा मोह आवरता आला नाही. अंगणवाड्यांना दिलेल्या गॅस कनेक्शनचं बिल काढण्यासाठी ही लाच घेतल्याची माहिती समोर आली आहे. उस्मानाबादच्या लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली असून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक झालेल्या तरुण अधिकाऱ्याचं नाव नारायण दशरथ गायके असून तो उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा याठिकाणी बालविकास प्रकल्प अधिकारी पदावर कार्यरत होता. शासनाच्या योजनेप्रमाणे तालुक्यातील अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन देण्याचं काम एका एजन्सीला देण्यात आलं होतं. या एजन्सीला 6 हजार 533 रूपये प्रतिगॅस प्रमाणे कंत्राट देण्यात आलं होतं. संबंधित एजन्सीनं तालुक्यातील 86 अंगणवाड्यांना हे गॅस कनेक्शन दिलं होतं.

सदर कामाचं 5 लाख 61 हजार 461 रुपये एवढं बिल आलं होतं. पण आरोपी अधिकारी नारायण गायके यानं प्रति गॅस कनेक्शन 563 रुपये 50 पैसे लाच मागितली. यानुसार 86 गॅस कनेक्शनचे एकूण 48 हजार 461 रुपयांची मागणी संबंधित गॅस एजन्सीकडे केली. पण तडजोड केल्यानंतर आरोपी गायके 40 हजार रुपये लाच घेण्यास तयार झाला.

रविवारी सुट्टीच्या दिवशी आरोपीनं एजन्सीकडून 40 हजार रुपये लाच स्विकारली. यावेळी उस्मानाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं छापा मारून आरोपी गायके याला रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी परंडा लाचलुचपत विभागात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी गायकेची चौकशी सुरू आहे. 32 वर्षीय आरोपी नारायण गायके गेल्याच वर्षी प्रशासकीय सेवेत भरती झाला होता.