.. आणि शिवद्रोही श्रीपाद छिंदम पुरता अडकला

  • by

 7 total views

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय ३५) याच्या विरोधात सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लीपमधील आवाज छिंदम याचाच असल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आणि सहा साक्षीदारांचे जबाब यांचा दोषारोपत्रात समावेश आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात हा आवाज छिंदम याचाच असल्याचे सिद्ध झाल्याने एकेकाळी भाजपचा माजी उपमहापौर असलेला श्रीपाद छिंदम हा चांगल्यापैकी कायद्याच्या जाळ्यात अडकला आहे .

तोफखाना पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे यांनी हे साठ पानांचे दोषारोपपत्र सोमवारी नगरच्या न्यायालयात दाखल केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये हा गुन्हा घडला होता. गुन्हा घडला तेव्हा छिंदम उपमहापौरपदावर होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी गृहविभागाची परवानगी हवी असते. त्यास मंजुरी मिळताच लगेचच हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

सदर गुन्हा हा ऑडिओ क्लिपवर आधारित आहे. बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द उच्चारले होते. छिंदम उपमहापौर असल्याने त्यांनी बिडवे यांना फोन करून एक काम सांगितले. मात्र, त्यावेळी शिवजयंती जवळ आली होती. त्यामुळे महापालिकेची संबंधित यंत्रणा त्या तयारीत असून ते काम झाले की, तुमचे करतो, असे बिडवे फोनवर छिंदमला विनंतीपूर्वक सांगत होते मात्र प्रेमाची भाषा छिंदमला समजली नाही .

बिडवे यांचे उत्तर ऐकताच छिंदम याने एकदम संतापून शिवरायांबद्दल गलिच्छ भाषा वापरली आणि बिडवे यांनाही शिवीगाळ केली. ही ऑडिओ क्लिप नंतर व्हायरल झाली. याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. या क्लिपचा वापर मुख्य पुरावा म्हणून होणार आहे. पोलिसांनी तपासात ही क्लिप आणि छिंदम याच्या आवाजाचे नमुने घेऊन फॉरेन्सिक लॅबला पाठविले होते. त्याचा अहवालही मिळाला असून तो पुरावा पोलिसांनी दोषारोपपत्रासोबत जोडला आहे. याशिवाय अन्य सहा साक्षीदारांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. छिंदम सध्या जामिनावर मुक्त आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून श्रीपाद छिंदम चर्चेत आला होता . भाजपमध्ये असलेल्या छिंदमची त्यानंतर पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आली होती मात्र आतून तो पक्षात सक्रियच होता. त्यानंतर देखील श्रीपाद छिंदमची शहरात दादागिरी (कोणाचा राजकीय वरदहस्त ? ) वाढतच होती.अहमदनगर निवडणुकीवेळी त्यांने ईव्हीएमची पूजा केली होती तर भाजप सत्तेत असताना त्याला देण्यात आलेले पोलीस संरक्षण हा देखील शहरात मोठा चर्चेचा विषय ठरलेला होता .

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीपाद छिंदम अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता तरीही अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत जातीनिहाय समीकरणामुळे विजय झाला होता.

महापालिकेत निवडून आल्याने त्याला आमदार होण्याची देखील स्वप्ने पडू लागली मात्र कोणत्याच पक्षाने त्याला तिकीट दिले नाही त्यानंतर त्याने कसे बसे करत बसपाचे तिकीट मिळवले मात्र त्याचा हा ओव्हर कॉन्फिडन्स नडला आणि नगरच्या मतदारांनी त्याला साफ नाकारले. नगरसेवक होण्यासाठी ठराविक भागातील एकगठ्ठा मतदान त्याला झाल्याने तो नगरसेवक म्हणून विजयी झाला मात्र विधानसभेत मात्र मतदारांनी साफ नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.