नगरमध्ये पुन्हा एक हनी ट्रॅप उघडकीस , यावेळी वापरली ‘ वेगळी ‘ आयडीया

  • by

 19 total views

पुन्हा एकदा नगर शहरानजीक असलेल्या वडगाव गुप्ता इथे हनी ट्रॅपची घटना उघडकीस आली असून एका पाठोपाठ एक अशा घटना उघडकीस येत असल्याने पोलिसही ह्या रॅकेटची पाळेमुळे खणण्यात काही प्रमाणात का होईना अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे लोक देखील ब्लॅकमेलिंगच्या भीतीने पोलिसांकडे येण्यास घाबरतात.

मोठी धेंड हेरायची अन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बदनामीची भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे , याच पद्धतीने नगर शहरात हनी ट्रॅपची रॅकेट कार्यरत आहेत. वडगाव गुप्ता येथील घटनेत पाथर्डीतील एका बागायतदाराला दोन लाख रुपयांना लुटून एक टोळी फरार झाली.

वडगाव गुप्ता परिसरात राहणार्‍या एका तरूणीने अन्य दोघांच्या साथीने पाथर्डी तालुक्यातील एका बागायतदाराला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी बागायतदाराने या टोळीला दोन लाख रुपये दिले मात्र नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी या टोळीविरोधात खंडणी, जबरी चोरी करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वडगाव गुप्ता येथील तरूणी, तिचा कथित पती व पाथर्डी तालुक्यातील एक साथीदार यांचा समावेश आहे. तिघेही सध्या पसार असून एमआयडीसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

असा रचला होता ट्रॅप ?

एमआयडीसीतील या तरुणीने बायगायतदाराशी फोनवर बोलून मैत्री केली आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १५ जूनला सायंकाळी त्यांना घरी बोलावून घेतले. बागायतदारही तिच्या बोलण्याला फसून तिच्या घरी आले. तेव्हा ती घरी एकटीच होती. काही वेळाने तिचा पती असल्याचे सांगत एक व्यक्ती घरी आला आणि दोघांना एकत्र आल्याचे पाहू त्याला राग आल्याचे भासवून त्याने बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि त्याच्याकडून पाच हजार रपये काढून घेतले.

दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील एकाला मध्यस्थी ठेवत बागायतदाराकडून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात आले. त्यांनी झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी तपास सुरू केला आहे .

काही महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील जखणगाव इथे देखील असाच प्रकार उघडकीस आला होता. तिथे देखील एका व्यावसायिकाची आणि आणि नंतर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. किराणा दुकान चालविणारी महिला आणि तिचा साथिदार पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्यानंतर अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात अशा घटना घडल्या आहे . अनेक घटना उघडकीस येऊन देखील लोक अशा लोकांच्या सापळ्यात अडकत चालेले आहे . अशाच ब्लॅकमेलिंगने एखाद्याचा जीव जाण्याची देखील भीती आहे .