राज कुंद्रा प्रकरण : व्हिडीओ कॉल मी जॉईन केला आणि त्यानंतर ..

शेअर करा

पोर्नोग्राफी कंटेंट प्रकरणात दोषी आढळल्याने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक केली. मुंबई येथे फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवून काही अ‍ॅप्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्मवर दाखविल्याबद्दल गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हे मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे मिळून आले आहेत.

राज कुंद्राला अटक झाल्यानंतर अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने देखील आपल्यालाही याबाबत वाईट अनुभव आल्याचं सांगितलं आहे. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता, असं दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे.

सागरिका सोना सुमन म्हणाली की, ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला, असा दावा सागरिका सोना सुमन हिने केला आहे. माझ्यासमोर असलेले तीन जण जे होते त्यातील एकाचा चेहरा झाकलेला होता तो बहुदा राज कुंद्रा असावा, असे सोना सुमन हिने म्हटले आहे .

पोर्नोग्राफी आणि पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी आपल्या देशात कायदे खूप कडक आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यात आयटी अ‍ॅक्टसोबतच भारतीय दंडविधान (आयपीसी) च्या अनेक कलमांखाली आरोपीविरोधात गुन्हा नोंद होतो. लैंगिक कृती आणि नग्नतेवर आधारित फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट, ऑडिओ आणि इतर साहित्याचा या कायद्यात समावेश होतो. अशा प्रकारचा कंटेट इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रकाशित करण्यावर किंवा कुणाला पाठवल्यास त्याच्यावर अँटी पोर्नोग्राफी लॉ लागू होतो.

दुसऱ्या व्यक्तीचे नग्न किंवा अश्लिल व्हिडीओ तयार करणे किंवा असा एमएमएस बनवणारे, अन्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणारे लोक या कायद्यांतर्गत येतात. या कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांमध्ये आयटी (दुरुस्ती) कायदा २००८ च्या कलम ६७(ए), आयपीसीचे कलम २९२, २९३, २९४, ५०० आणि ५०९ अन्वये शिक्षेची तरतूद आहे. गुन्ह्याच्या गांभीर्याच्या दृष्टीने पहिल्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दहा लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ही शिक्षा ७ वर्षांपर्यंत वाढू शकते.


शेअर करा