नगरमध्ये शेतकऱ्याचा हनी ट्रॅप करणारी ‘ ती ‘ महिला अखेर …

शेअर करा

पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडुन खंडणी वसूल करणाऱ्या महिलेसह तिच्या एका साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यात महिलेला मदत करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

शितल किरण खर्डे व गणेश छगन गिऱ्हे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हनीट्रॅपची शिकार झालेल्या शेतकऱ्याने 18 जुलै रोजी फिर्याद दिल्यानंतर शितल खर्डे आणि तिच्या साथीदाराचे हे कृत्य समोर आले. फिर्यादी हा पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असून शितल हीने फसवणूक करण्याच्या उद्देशानेच त्याच्याशी ओळख वाढवली होती. 15 जून रोजी संध्याकाळी शितलने फिर्यादी यास तिच्या वडगाव गुप्ता येथील घरी बोलावून घेतले.

तिथे पोहोचल्यानंतर त्याच्याशी जवळीक करत फोटोही काढले त्याच दरम्यान घरात हे दोघे एकत्र असताना एक तरुण अचानक पोहोचला आणि शितलचा वती असल्याचे सांगत दोघांना एकत्र पकडले, असे म्हणत शितल आणि तिच्या साथीदाराने फिर्यादी यास मारहाण केली आणि त्याच्याकडून पाच हजार रुपये हिसकावून घेतले. पाच हजार रुपये घेऊन देखील शीतल व तिच्या साथीदारांची समाधान झाले नाही त्यांनी फिर्यादी यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून गणेश गिऱ्हे याच्या मध्यस्थीने दोन लाख रुपये देखील उकळले.

शितल खर्डे व तिच्या साथीदारांनी अशाच पद्धतीने आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांना संशय आहे. या आरोपींनी इतर कोणाची अशा पद्धतीने अशी फसवणूक केलेली असेल तर न घाबरता पुढे यावे असे आवाहन एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांनी केले आहे. दरम्यान या गुन्ह्यात पोलिसांनी शितलच्या पतीला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले होते मात्र चौकशी दरम्यान शितल हि पतीपासून वेगळे राहत असल्याचे समोर आले आहे त्यामुळे सदर प्रकरणात अद्यापपर्यंत तिच्या पतीला अटक करण्यात आली नाही.

मोठी धेंड हेरायची अन त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बदनामीची भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे , याच पद्धतीने नगर शहरात हनी ट्रॅपची रॅकेट कार्यरत आहेत. वडगाव गुप्ता येथील घटनेत पाथर्डीतील एका बागायतदाराला दोन लाख रुपयांना लुटून एक टोळी फरार झाली होती मात्र आता आरोपी पकडण्यात आले असून मोठे खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

असा रचला होता ट्रॅप ?

एमआयडीसीतील शीतल खर्डे या तरुणीने एका बागायतदाराशी फोनवर बोलून मैत्री केली आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १५ जूनला सायंकाळी त्यांना घरी बोलावून घेतले. बागायतदारही तिच्या बोलण्याला फसून तिच्या घरी आले. तेव्हा ती घरी एकटीच होती. काही वेळाने तिचा पती असल्याचे सांगत एक व्यक्ती घरी आला आणि दोघांना एकत्र आल्याचे पाहू त्याला राग आल्याचे भासवून त्याने बागायतदाराला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि त्याच्याकडून पाच हजार रपये काढून घेतले.

दुसर्‍या दिवशी पाथर्डी तालुक्यातील गिऱ्हे यास मध्यस्थी ठेवत बागायतदाराकडून दोन लाख रूपयांचे तीन चेक घेतले त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे त्या बागायतदाराच्या लक्षात आले. त्यांनी झालेला सर्व प्रकार एमआयडीसी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी तपास सुरू केला आणि आरोपीस जेरबंद केले .

काही महिन्यांपूर्वी नगर तालुक्यातील जखणगाव इथे देखील असाच प्रकार उघडकीस आला होता. तिथे देखील एका व्यावसायिकाची आणि आणि नंतर एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याची अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याचे उघड झाले होते. किराणा दुकान चालविणारी महिला आणि तिचा साथिदार पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. त्यानंतर अकोले, संगमनेरमध्येही मागील आठवड्यात अशा घटना घडल्या आहे . अनेक घटना उघडकीस येऊन देखील लोक अशा लोकांच्या सापळ्यात अडकत चालेले आहे . अशाच ब्लॅकमेलिंगने एखाद्याचा जीव जाण्याची देखील भीती आहे .


शेअर करा