नगरमधील सावकारी फास, दोन लाखांसाठी म्हणाला बॉण्ड आन अन लिह..

  • by

 40 total views

दोन लाख रुपयांची मुद्दल आणि त्यावरील व्याजापोटी खासगी सावकाराने तब्बल 25 लाख रुपयांची 20 गुंठे जमीन लिहून घेतल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे उघड झाला आहे. याप्रकरणी या बेकायदा सावकारासह त्याची पत्नी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत असल्याने जिल्ह्यातील सावकारांच्या अन्यायाच्या अनेक कथा आता समोर येऊ लागल्या आहेत. सुखदेव दिनकर केदारी, छाया सुखदेव केदारी (रा. मिरजगाव, ता. कर्जत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून कुंडलिक छगन सुपेकर (रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांनी फिर्याद दिली आहे.

कुंडलिक सुपेकर यांनी 2015 साली बांबू आणि स्टेशनरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी संदीप नावाच्या मित्राकडे पैशांची मागणी केली होती. मात्र संदीपने ‘माझ्या परिचयातील खासगी सावकार असून, त्याच्याकडून पैसे घेऊ शकतो,’ असे त्यांना सांगितले होते. यानंतर सुपेकर यांनी संदीपच्या मध्यस्थीने सुखदेव केदारी याच्याकडून चार टक्के व्याजदराने दोन लाख रुपये घेण्याचे ठरले.

सुपेकर यांच्या मालकीची मधुकमल मंगल कार्यालयासमोरील 20 गुंठे जमीन त्याबदल्यात मध्यस्थ संदीप याच्या नावे करून देण्याचे ठरले होते. इच्छा नसतानाही सुपेकर यांनी संदीपच्या नावाने 7 डिसेंबर 2015 रोजी जमिनीचे खरेदीखत करून दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केदारी याने सुपेकर यांना चार टक्के दराने दोन लाख रुपये आणून दिले त्यानंतर चार महिन्यांचे व्याज आठ हजार रुपये केदारी याला देण्यात आले. मात्र त्यानंतर सुपेकर यांना वेळेवर व्याज देणे जमले नाही.

त्यानंतर मात्र सावकाराने संदीप याच्या नावे असलेले क्षेत्र पत्नी छाया केदारी हिच्या नावावर करून देण्यास सांगितले आणि 23 जानेवारी 2017 रोजी हे क्षेत्र सावकाराच्या पत्नीच्या नावे करून देण्यात आले. खरेदी झाल्यानंतर सुपेकर यांना ही बाब समजली. व्याज व मुद्दल दिल्यानंतर ही जमीन पुन्हा सुपेकर यांच्या नावे पलटून देण्याचे ठरले होते मात्र सावकाराने यास हात वर केले.

एप्रिल 2021 मध्ये सुपेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी सावकाराकडे जाऊन सर्व रक्कम परत देऊन जमीन पलटून देण्याची विनंती केली. मात्र केदारी, त्याची पत्नी आणि इतरांनी ‘जमीन पुन्हा मला मागायची नाही. ही जमीन आम्ही दत्तात्रय कोरडे याच्याकडून घेतली आहे. त्यात तुमचा काहीही संबंध नाही. जमीन हवी असेल तर 25 लाख द्यावे लागतील व 20 गुंठय़ांतील दोन गुंठे क्षेत्र माझ्या नावे करून द्यावे लागेल,’ अशी अट घातली. हतबल झालेल्या सुपेकर यांनी प्रतिष्ठित मंडळी, राजकीय मंडळी अशा अनेकांना या प्रकरणात मध्यस्थी करायला सांगितले. मात्र, सावकार केदारी आपल्या अटीवर ठाम होता.

सुपेकर यांचे प्रयत्न पाहून केदारी याने 7 जून 2021 रोजी कर्जतच्या बँकेकडून या जागेवर नऊ लाखांचे कर्ज घेतले. याबाबत विचारणा केली असता, ‘मी आता चालू बाजारभावाने हे क्षेत्र विकणार असून, तुला काय करायचे ते कर,’ अशी धमकी केदारी याने सुपेकर यांना दिली. त्यानंतर केदारी हा कोकणगाव येथील एका इसमाला हे क्षेत्र 28 लाख रुपयांना विकत असल्याचे समजल्याने सुपेकर यांनी सुखदेव केदारी, छायाबाई केदारी व इतरांविरोधात फिर्याद दिली आहे.