‘ मॅडम तुम्ही छान दिसताय ‘ अहमदनगरमध्ये तरुणावर गुन्हा दाखल

  • by

 35 total views

वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा तरुणाने विनयभंग केल्याची घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, अशा कमेंट्स करत तरुणाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून बदनामीचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सदर तरुणावर केला गेला आहे .

काय आहे प्रकरण ?

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याचं प्रकरण समोर आलं असून या प्रकरणी एका तरुणावर शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल विजयकुमार बलदवा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, असं भाष्य करत महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

आमरण उपोषणाच्या नावाखाली महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून सामाजिक आणि कौटुंबिक बदनामी केल्याचा आरोप आहे. तसेच महिला अधिकाऱ्याचे पती आणि मुलीबद्दल फोनवर अश्लील आणि अर्वाच्च भाषेत संभाषण केल्याचाही दावा केला जात आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला जात होता असे पीडित महिला अधिकाऱ्याचे म्हणणे आहे .

संबंधित महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विशाल बलदवा त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित महिला अधिकाऱ्याने दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी प्राथमिक चौकशी करून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला.

महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल हा फोन करून कार्यालयात चकरा मारून, ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होता तसेच अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मदत करून व यातून येणारे पैसे पोहोच करून महिला अधिकाऱ्यास लाचेचे आमिष दाखवत होता तसेच माझ्याजवळ मन हलके करत जा, तुम्ही छान ड्रेस घालता त्यामुळे तुम्ही छान व फ्रेश दिसता , असे म्हणत संबंधित महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा त्याने प्रयत्न केला.