निव्वळ निर्लज्जपणा..म्हणे दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही

शेअर करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झालेला नाही, अशी धक्कादायक आणि तितकीच खोटी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल राज्यसभेत दिली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालाचा आधार या माहितीला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं. काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला . देश विदेशामधून मग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि ऑक्सिजन कशासाठी मागत होतात ? असा देखील प्रश्न काँग्रेस सदस्यांनी यावेळी उपस्थित केला.

ऑक्सिजनअभावी केवळ दिल्लीतच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिला होता त्यानंतर आता इतर पक्षांनीही केंद्रावर टीकेची तोफ डागली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील दिली आहे . मात्र मे महिन्यात राज्य सरकारने देखील तसाच अहवाल उच्च न्यायालयात सादर केला होता, असे भाजपचे म्हणणे असून त्यावरून आता राज्य आणि केंद्र सरकार दरम्यान जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे .

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करताना ‘ऑक्सिजन अभावी ज्यांचे नातेवाईक गेले, जे सिलिंडरसाठी इकडे तिकडे धावत होते का? त्यांचा सरकारच्या या दाव्यावर विश्वास बसतो का हे पाहावं लागेल. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांत मृत्यू झाले आहेत. अशा मृतांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा तोंडी असेल. सरकार सत्यापासून दूर पळतंय. हा कदाचित ‘पेगॅसस’चा परिणाम असेल ‘ असे म्हटले मात्र त्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे .

चित्रा वाघ यांनी ट्वीट करून राऊतांना प्रश्न विचारला आहे “ऑक्सीजनअभावी एकही मृत्यू झाले नाहीत, असं उत्तर दिल्याने केंद्रावर खटला भरावा असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. मग महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात मा. उच्च न्यायालयात ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र दिलंय… मग राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झालेत की नाही ? या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्र सरकारने सोमवारी संसदेमध्ये ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, असं जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून केंद्राला लक्ष्य केलं जात आहे, तर केंद्र सरकारने राज्यांनीच ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची भूमिका घेतली असल्याने मृत्यूचे देखील निर्लज्ज राजकारण कसे केले जाते, याचाही प्रत्यय जनतेला आला असेल. ऑक्सिजनअभावी शरीरातील एक एक अवयव निकामी झाला तर तो मृत्यू त्या अवयवाच्या फेल्युअरमुळे झाला आहे , असा जावईशोध राज्यांनी लावलेला आहे आणि त्याचा आधार घेत केंद्राने देखील हात वर केले आहे .

भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना खोचक सल्ला दिला आहे ,“ मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं होतं की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाचा म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला” .

अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना आणखीन सुनावलं असून , “अहो संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाहीत. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगत आहेत. मग आता तोच न्याय स्वत:लाही लावा”, असं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.


शेअर करा