नगर शहरातील विवाहित महिला प्रियकरासोबत पळाली, पोलिसांनी पकडून आणले मात्र..

  • by

 92 total views

तिच्या लग्नानंतर पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात जुन्या प्रियकराची एंट्री झाली आणि सुखी संसाराला ग्रहण लागले. जुन्या प्रेमासाठी तिने बहरलेल्या संसाराला लाथ मारली खरी मात्र पुढे प्रकरण एका वेगळ्या वळणावर गेले आणि तिच्यावर पश्चातापाची वेळ आली. घटना नगर शहरातील असून सध्या या महिलेची रवानगी तात्पुरती स्नेहालय या संस्थेत करण्यात आली आहे .

काय आहे प्रकरण ?

नगर शहरातील तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला त्यानंतर या जोडीला एक मुलगी देखील झाली मात्र याच दरम्यान तिच्या संसारात जुन्या प्रियकराची एंट्री झाली आणि त्यानंतर ती अचानक आपल्या जुन्या प्रियकराबरोबर पळून गेली. सासरच्या मंडळीने ती गायब झाल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दिली.

तोफखाना पोलिसांनी तिचा शोध घेतला आणि तिला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर सासरच्या व माहेरच्या लोकांना पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. मात्र तिला दोन्ही कुटुंबांनी घरात घेण्यास नकार दिला. आपल्याला एक वेळ माफ करून घरात घ्यावे, यासाठी ती सासरच्या व माहेरच्या प्रत्येकाकडे आशेने पाहत होती. आपल्या चुकीचा पश्चात्ताप तिला झाला होता मात्र तिला माफ करण्याची कोणाचीच भूमिका नव्हती .

कोणी तरी ‘चल घरी’ असे म्हणेल, म्हणून ती प्रत्येकाकडे आशेने पाहत होती मात्र कोणीही तिला दया दाखवली नाही. आईच्या चुकीमुळे त्या निरागस मुलीकडे देखील नातेवाइकांकडून दुर्लक्ष केले जात होते. आजी-आजोबा देखील जवळ घेत नसल्याने चिमुरडीच्या डोळ्यांतून अश्रूंना मिळालेली मोकळी वाट पाहून उपस्थितांनाही गहिवरून येत होते मात्र कोणालाही पाझर फुटला नाही.

तोफखाना पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद असलेल्या तक्रारीबाबत तपास करून संबंधित महिलेचा शोध घेण्यात आला. सासर व माहेरच्या नातेवाइकांनी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे स्नेहालय संस्थेत तात्पुरत्या निवाऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे, असे ज्योती गडकरी, पोलिस निरीक्षक यांच्या वतीने सांगण्यात आले आहे .