नगरमध्ये कोरोना वाढला , ‘ ह्या ‘ तालुक्यात सर्वाधिक रुग्ण मात्र प्रसिद्धीचा सोस आवरेना

शेअर करा

नगर जिल्ह्यात कोरोना पुन्हा उलटलाय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे . सुमारे दीड महिन्यानंतर जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या पुन्हा चार अंकी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत ७५२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १०२६ नवे रुग्ण आढळून आले आहेत यात पारनेर तालुक्यात सर्वाधिक २१० रुग्ण आहेत. जिल्ह्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या आता ४,४९६ झाली आहे

रविवारी जिल्ह्यातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला. पारनेर, जामखेड, शेवगाव, कर्जत, संगमनेर या तालुक्यांत लक्षणीय वाढ झाली आहे तर तुलनेत लोकसंख्या जास्त असून नगर शहरात ही संख्या २३ वरच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पारनेर तालुक्यात सर्वाधिक नवे रुग्ण आढळून येत आहे. तेथे सध्या अनेक उपाययोजना केल्याचे सांगण्यात येत असले तरी आकडे कमी होताना दिसत नाही तर प्रशासकीय पातळीवर परस्पर संवादाचा निव्वळ बट्याबोळ आहे तर लसीकरण देखील लस उपलब्ध नसल्याने पुरेश्या प्रमाणात होत नाही .

लग्न, वाढदिवस यासारख्या कार्यक्रमांमुळे संसर्ग वाढत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र राजकीय बैठका आणि कार्यक्रमही जोरात सुरू आहेत. पारनेर प्रशासन देखील कोरोना रोकथामासाठी गंभीर नसल्याचे चित्र आहे. नगर चौफ़ेरच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष तहसील कार्यालयाला भेट दिली असता तहसील कार्यालय यांचे वेळोवेळी येणारे अपडेट याबद्दल संबंधित कर्मचारीच संभ्रमात असल्याचे चित्र आहे तर कोव्हीड कक्षामधील कर्मचारी देखील रोजच्या अपडेटपासून दूरच असल्याचे चित्र होते. सदर प्रकार तहसीलदार ज्योती देवरे यांच्या कानी घालण्यात आला असून उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले आहे.

राज्यस्तरावरील नेते जिल्ह्यात येऊन बैठका, मेळावे घेत असल्याने नियमावली फक्त घरगुती कार्यक्रमासाठी आहे का ? असे नागरिक आता बोलू लागले आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही कार्यक्रम सुरूच आहेत.पारनेर तालुक्यात एका बाजूला कडक निर्बंध लावताना दुसरीकडे प्रशासकीय अधिकारीही गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना नियमांकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. टाळता येण्यासारखे असलेले कार्यक्रम देखील निव्वळ प्रसिद्धीचा सोस म्हणून टाळून आता शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना नागरिकांसाठी आदर्श घालून द्यावे लागतील .

जिल्ह्यातील वाढलेले आकडे फिरल्याचे पाहून आता जिल्हा प्रशासनाने देखील पुन्हा उपाय योजना कडक करण्याचे ठरविले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, सोमवारपासून नियम न पाळणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मोहीम कडक करण्यात येणार आहे. वीक एंड लॉकडाऊन आणि अन्य नियमांचे पालन करण्याकडे नागरिकांचा कल अजिबात दिसून येत नाही तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनही याकडे सर्रास दुर्लक्ष करीत आहेत. लस उपलब्ध नसल्याने नागरिक देखील आता संतापलेले पाहायला मिळत आहेत.


शेअर करा