आयुक्तसाहेब ..किती दिवस हातगाड्या टपऱ्या उचलणार ? कधीतरी एकदा..

शेअर करा

नगर शहरातील अतिक्रमणविरोधात महापालिकेने मोहीम उघडली असून आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर येत या मोहिमेचे नेतृत्व करत रस्त्यावरील टपऱ्या हटवल्या आहेत . कोरोना काळात गोरगरिबांचे विशेषत: हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यवसायिकांचे आर्थिकदृष्टया अतोनात हाल झाले आहेत मात्र महापालिकेकडून कोणतीही दयामाया न दाखवता कारवाई केली गेल्यामुळे या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर दुसरीकडे मोठ्या धेंडांची अतिक्रमणे काढण्यास महापालिकेकडून सर्रास टाळाटाळ केली जात आहे . शहरातील विविध पत्रकार आणि नागरिकांनी यासंदर्भात तक्रारी करून देखील हातगाड्या अन टपऱ्या उचलण्यात मर्दुमकी दाखवणारी महापालिका मोठ्या अतिक्रमणाच्या बाबतीत मात्र चिडीचूप आहे .

छोट्या व्यवसायिकांची रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी महापालिका जितका आक्रमकपणा दाखवते तितका आक्रमकपणा मोठे व्यक्ती तसेच राजकीय वरदहस्त असलेले शहरातील बडे हस्ती यांच्याबाबतीत दाखवत नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर देखील महापालिका अधिकारी टोलवाटोलवी करत राहतात आधी प्रभाग समिती नंतर नगर रचना विभाग मग अतिक्रमण विभाग अशा प्रत्येक विभागात नागरिकाची ससेहोलपट सुरू राहते मात्र त्यानंतर देखील मोठी धेंडे असल्यास नोटीस देखील पाठवण्याची हिंमत महापालिका अधिकारी करत नाहीत त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभाग हा केवळ छोट्या टपर्‍या उचलण्यापर्यंतच मर्यादित आहे का ? मोठी अतिक्रमणे देखील काढण्याची हिंमत महापालिका कधी दाखवणार असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. आयुक्त शंकर गोरे यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी जो न्याय श्रीमंतांना तोच न्याय गरिबाला गरिबांना लावणार का ? असा सवाल देखील नागरिक आता विचारत आहेत

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारती समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या सोमवारी हटवण्यात आल्या. महापालिका आयुक्त शंकर गोरे सोमवारी सकाळी मोठा फौजफाटा घेऊन जिल्हा परिषद समोरील रस्त्यावर आले आणि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून कारवाईला सुरुवात केली. कारवाईचे पथक दाखल झाल्याने फळ विक्रेत्यांची चांगलीच धावपळ झाली. सुरुवातीला ही कारवाई माळीवाडा वेशीपर्यंत सुरू होती. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी विशाल गणपती मंदिर, पंचपीर चावडी, माणिक चौक या परिसरात देखील कारवाईस सुरुवात केलेले झाल्याचे पाहून काही फळ विक्रेत्यांनी स्वतःहून हातगाड्या काढून घेतल्या तर कापड बाजारात देखील एमजी रोड दुकानासमोरील झाडू व इतर साहित्याची विक्री करणार्‍यांवर देखील कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असले तरी कोरोना काळात लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडलेल्या छोट्या व्यवसायिकांचे अतोनात हाल झाले आहेत तर दुसरीकडे महापालिकेकडून शहरातील मोठ्या नामांकित व्यक्तींची अतिक्रमणे काढण्यास महापालिकेकडून सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याने देखील काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनमुळे बुडालेले रोजगार अन बसलेला धंदा यामुळे सध्या सर्वच थरात आर्थिक मंदीचे वातावरण आहे . आधीच लहान व्यावसायिकाचा धंदा हा १०-२० टक्क्यावर आला आहे त्यात कारवाई करून महापालिकेने आपल्या असंवेदनशीलतेचा परिचय दिला आहे .

मोठ्या धेंडांसाठी मात्र महापालिका चिडीचूप

शहरात अनेक ठिकाणी मोठ्या राजकीय व्यक्तींची तसेच खिशाने श्रीमंत असलेल्या व्यक्तींची अतिक्रमणे आहेत. नियमबाह्य वाढीव बांधकामे तसेच सदर अतिक्रमण संदर्भात महापालिकेत तक्रार दिली असता अतिक्रमणाचे काम प्रभाग समिती पाहते असे सांगून नागरिकाला पहिल्यांदा प्रभाग समितीकडे टोलवण्यात येते. प्रभाग समिती आपला अहवाल दिल्यानंतर कारवाईसाठी नगररचना विभागाचे मत मागवते व त्यानुसार कारवाईची दिशा ठरवते मात्र नगररचना विभागात काही ( अर्थपूर्ण ? ) तडजोडीमुळे नगररचना विभागाकडून योग्य तो अहवाल प्रभाग समितीकडे जात नाही. कारवाईचा केवळ जुजबी तपशील देऊन नागरिकांची बोळवण केली जाते.

नगररचनाकडून पूर्णतः हा तपशील दिला जात नसल्यामुळे प्रभाग समितीकडून देखील कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येते. हातगाड्या अन टपर्‍या उचलणारी महापालिका मोठ्यांच्या अतिक्रमणाच्या बाबतीत का शांत राहते ? हा देखील प्रश्न उपस्थित होतो. आयुक्तांपर्यंत देखील अनेक प्रकरणे पोहोचली आहेत मात्र तरीदेखील आयुक्तांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी सातत्याने दिशाभूल करण्यात पटाईत झालेले आहेत .

अखेर वैतागून नागरिक कोर्टाच्या दारात पोहोचल्यानंतर प्रकरण कोर्टात चालू आहे असे सांगत महापालिकेला आणखीन एक कारण मिळते. महापालिकेच्या असल्या निष्क्रियतेमुळे शहरात मोठ्या प्रमाणात राजकीय व्यक्ती आणि अधिकाऱ्यांचा खिसा गरम करू शकणाऱ्या व्यक्ती यांची अतिक्रमणे आहेत मात्र त्यांच्यावर कारवाईची सोडा तर साधी नोटीस पाठवण्याची देखील महापालिका हिम्मत करत नाही यावरूनच महापालिकेची कारवाई किती एकतर्फी पद्धतीने केली जाते हे नगरकर चांगलेच जाणून आहेत.


शेअर करा