औषध आहे सांगून बापाने स्वतःच्या पोराला पाजले विष : नगरमधील घटना

शेअर करा

जन्मदात्या बापाने लहान्या मुलाच्या मदतीने मोठ्या मुलाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोंढवड या गावी घडली असून याप्रकरणी रविवारी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष पाजण्याचा प्रयत्न झालेल्या व्यक्तीची तब्येत आता सुधारत आहे .

उपलब्ध वृत्तानुसार, गणेश बाळासाहेब म्हसे ( वय 35 ) याने राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे की नऊ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान तो त्याच्या घरात अंथरुणावर झोपलेला होता. त्यावेळी त्याचे वडील बाळासाहेब रावसाहेब म्हसे व भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे हे दोघे आले. त्यांनी तुझे बरे तुझे दुखणे बरे आहे का ? तू जेवण केले का ? असे विचारत तुझ्यासाठी औषध आणले आहे असे सांगितले. हे औषध घेतल्याने तुला बरे वाटेल असे देखील ते म्हणाले.

घास फवारणीसाठी आणलेल्या कीटकनाशकाची बाटली गणेश याने वडिलांच्या हातात पाहिली त्यामुळे त्याने ते पिण्यास नकार दिला. त्याने नकार दिल्याचे पाहून गणेशाचा लहान भाऊ ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे याने गणेशला पाठीमागुन दाबून धरले व वडील बाळासाहेब रावसाहेब म्हसे याने त्याच्या हातातील कीटकनाशक गणेशच्या तोंडात ओतले. गणेश त्यांना विरोध करत होता मात्र आरोपींनी त्याला संगणमत करून बळजबरीने औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

गणेश म्हसे यांच्या फिर्यादीवरून 25 जुलै रोजी राहुरी पोलिसात आरोपी बाळासाहेब रावसाहेब म्हसे व ज्ञानेश्वर बाळासाहेब म्हसे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे तपास करत आहेत.

नऊ जुलै रोजी गणेश याला विष पाजून मारण्याचा प्रयत्न त्याचा बाप व भाऊ यांनी केला होता. यात गणेश बेशुद्ध पडला होता त्यानंतर त्याला नातेवाईक आणि दवाखान्यात दाखल केले तेव्हापासून 25 जुलै पर्यंत गणेशवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी गणेशला बरे वाटू लागल्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला.


शेअर करा