पारनेरमध्ये चाललंय तरी काय ? .त्या पाच शिवसेना नगरसेवकांच्या पक्षांतराला पुन्हा ‘ नाट्यमय ‘ कलाटणी

शेअर करा

पारनेरच्या राजकारणात आज पुन्हा नाट्यमय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नुकतीच चर्चा झाली होती त्यानंतर शिवसेनेचे ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आहे. एक आठवड्याच्या आतच शिवसेनेतून राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना असा त्यांचा जबरदस्त प्रवास झाला आहे . या सर्व नगरसेवकांनी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपण शिवसेनेतच असल्याचे दाखवून दिले आहे .

पारनेरमधील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार नीलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यातील अंतर्गत राजकीय विरोधातल्या परिस्थितीमुळे पारनेर नगर पंचायतीतील पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खुद्द अजित पवारांनी त्यांना पक्षात प्रवेश दिल्याने राज्यात महाआघाडीच्या ऑल इज वेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. सत्ताधारी आघाडीत असा प्रकार घडल्याने हा प्रकार मीडियात चांगलाच गाजला. अर्थात हा फार लहान विषय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर या नगरसेवकांना मुंबईत बोलावण्यात आले.

ते पाच नगरसेवक मुंबईत दाखल होताच मंत्रालयात अजित पवार, मिलिंद नार्वेकर नीलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर जाण्यास सांगण्यात आले. शिवसेनेच्या तालुका महिला आघाडी प्रमुख उमा बोरुडे, नगरसेवक विजय वाघमारे, माजी आमदार विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे हे देखील मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित होते .

मातोश्रीवर पाच नगरसेवकांनी आपली बाजू मांडली असून नाराजीचे खरे कारण स्पष्ट केले त्यानंतर काही चर्चा आणि उपाय सुचवले गेले.आमदार निलेश लंके आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात ह्या विषयावर समन्वय राखण्याची जबाबदारी देण्यात आली. ह्या फोडाफोडीसाठी निलेश लंके यांना जबाबदार ठरवण्यात आले होते मात्र राष्ट्रवादी-शिवसेना संबंध अशाने बिघडत असल्याचे लक्षात आल्यावर प्रकरण मिटविण्याची जबाबदारीही लंके यांच्यावर सोपविण्यात आली आणि निलेश लंके व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून यात मार्ग काढून राष्ट्रवादीने पळवलेले नगरसेवक पुन्हा शिवसेनेकडे पाठवले.

सुरुवातीला हे नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते मात्र त्यांनी विरोधी पक्षात जाऊ नये म्हणून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचा खुलासा निलेश लंके यांनी केला. वरिष्ठांशी चर्चेनंतरच हा निर्णय झाल्याचा दावा देखील लंके यांनी केला मात्र आता ‘ झालं गेलं गंगेला मिळाल ‘ असं झालं असून ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेतच राहणार आहेत.

लॉकडाऊन या काळात निलेश लंके यांनी लोकांसाठी केलेल्या कामांवर शरद पवार सध्या समाधानी आहेत. पारनेर तालुक्यात देखील निलेश लंके यांची जादू अद्यापही ओसरलेली नाही . एकेकाळी शिवसेनेचे विजय औटी यांचे खंदे समर्थक असलेल्या निलेश लंके यांनी शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यावर राष्ट्रवादीत दाखल होत विधानसभेत विक्रमी विजय मिळवला होता . साधी राहणी आणि जनसामान्यांशी असलेला संपर्क ही निलेश लंके यांची खासियत राहिलेली आहे .


शेअर करा