‘ धन्यवाद मोदीजी ‘ हटवले, सुजय विखेंची ऍलर्जी की निष्ठावंत दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ? : सविस्तर बातमी

शेअर करा

नगर महापालिकेत सत्तांतर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले मोफत लसीकरणाचे लसीकरण अभियानाची जाहिरात करणारे फलक महापालिकेने मंगळवारी अचानकपणे हटवले. ‘ धन्यवाद मोदीजी ‘ अशा आशयाचे हे फलक मंगळवारी महापालिकेकडून हटवले गेले. नगर महापालिकेत भाजपची सत्ता गेल्यानंतर प्रथमच अशा स्वरूपाची कारवाई भाजपशी संबंधित होर्डिंग्जवरच करण्यात आल्यामुळे पूर्ण शहरात ही कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे तर त्याला नगर शहरातील अंतर्गत राजकीय किनार देखील आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर देखील नगर महापालिका भाजपच्या हातात होती मात्र नगर महापालिकेत नुकतेच सत्तांतर होऊन महाविकास आघाडी सत्तेत आली आहे. नगर महापालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्यावर चौकशीची टांगती तलवार आहे त्यामुळे आपण महाविकास आघाडीशी एकनिष्ठ कसे आहोत ? हे दाखवण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली गेली असल्याची जास्त शक्यता आहे .

दुसरे असे की , मोदी यांच्या होर्डिंग्जवर नगरचे खासदार सुजय विखे यांचे फोटो असल्याने नगर शहराच्या अंतर्गत राजकारणात सुजय विखे यांची छबी झळकणे, हे देखील स्थानिक नेत्यांना सुसह्य होत नसल्याने ही कारवाई केली गेली असल्याची दाट शक्यता आहे . नगर महापालिकेत कोणाच्या आदेशावरून कारवाया होतात किंवा थांबतात , हे देखील नगरकरांना चांगलेच ठाऊक आहे तसेच अधिकारी वर्ग कोणाचा निष्ठावंत आहे, हे देखील सांगण्याची गरज नाही.

महापालिकेच्या लसीकरण केंद्राबाहेर काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने मोठे मोठे फलक लावले गेले होते त्यावर वरच्या बाजूला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे व बाळासाहेब विखे यांचे फोटो देखील होते. दुसर्‍या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो होता. फलकावर मध्यभागी ‘ सर्वांना मोफत लस ‘ असे ठळक अक्षरात लिहिलेले होते आणि त्याखाली मोफत लसीकरण अभियान असा मजकूर होता. पंतप्रधानांच्या फोटोखाली ‘ धन्यवाद मोदीजी ‘ असे पांढऱ्या अक्षरात लिहिलेले होते तर भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद दिले होते.

नगर शहरात सुजय विखे यांचे फलक झळकू लागल्याने सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला विशेषतः अधिकारी वर्गाला यानिमित्ताने आपली निष्ठा दाखवण्याची जणू संधीच मिळाली आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली. नागरिकांच्या तक्रारीवर काहीही कारवाई न करता त्यांना वेगवेगळ्या विभागात हेलपाटे लावण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई इतकी विद्युत वेगाने कोणाच्या आदेशावरून केली की केवळ राजकीय निष्ठा दाखवून संभाव्य कारवाई टाळण्यासाठी ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही एव्हाना होणारही नाही .

मोफत लसीकरणाची जाहिरात करणाऱ्या फलकाबाबत पालिकेला तक्रार प्राप्त झाल्यानंतर इतर वेळी सातत्याने दुर्लक्ष करणारी पालिका अचानकपणे ॲक्टिव्ह झाली आणि राणा भीमदेवी थाटात त्यांनी कारवाईला सुरुवात केली. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या मंगळवारी नागापूर, भोसले आखाडा व मुकुंद नगर येथील लसीकरण केंद्राबाहेरचे फलक हटवले या कारवाईवरून भाजपच्या नेत्यांनी फोन करून पालिकेला जाब विचारला त्यानंतर सदर कारवाई थांबवण्यात आली.

सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीकडे सातत्याने पाठ फिरवणारे महापालिका अधिकारी अचानकपणे इतके ऍक्टिव्ह कसे झाले आणि कोणाच्या आदेशावरून त्यांनी तात्काळ कारवाई सुरुवात केली ? या प्रकाराची नगर शहरात मोठी चर्चा सुरू आहे. आदेश कोणी दिले नसतील तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीवर देखील अधिकारी इतकी तात्काळ कारवाई करतील का ? हा मात्र प्रश्न आहे.

मोदी यांचे होर्डिंग काढल्यामुळे शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांचा मुद्दादेखील चांगलाच ऐरणीवर आला आहे .महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या महापालिका प्रशासनाने नरेंद्र मोदी व खासदार डॉक्टर सुजय विखे यांचे छायाचित्र असलेल्या फलकावर कारवाई केल्याने भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर यापुढे देखील सातत्याने विनापरवाना फलकांवर नगर महापालिका कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

शहरासह उपनगरात अनेक राजकीय पक्षांचे मोठे मोठे फलक लावण्यात येतात. शहरातून जाणारे महामार्ग जाहिरात फलकाने झाकोळून गेलेले आहे तर शहरातील प्रमुख चौकात राजकीय नेत्यांचे वाढदिवस, अभिनंदन, नेत्यांचे स्वागत यासह अनेक अनधिकृत फलक आहेत. महापालिकेने लॉकडाउन नंतर प्रथमच ही कारवाई केल्याने भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून सदर फलकांसाठी रीतसर परवानगी साठी अर्ज करण्यात आला आहे. इतर वेळी कासवछाप गतीने चालणारा महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग अचानकपणे इतका ऍक्टिव्ह कसा झाला तसेच त्यांनी ही कारवाई स्वतःहून केली की कुणाच्या गुप्त आदेशावरून याबद्दल देखील साशंकता व्यक्त केली जात आहे .


शेअर करा