मर्सिडीज स्वस्तात देतोय असं सांगितलं अन म्हणाला ..

शेअर करा

कोरोना काळात ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. असाच एक फसवणुकीचा प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उघड झाला आहे. मुंबईतील कार एजेंटच्या नावाने एका व्यक्तीने भोपाळमधील व्यावसायिकाला तब्बल 67 लाखांचा गंडा घातला आहे. कमी किमतीत महागडी गाडी मिळवण्याचा सोस या व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला आहे .

मुंबईतील कार एजेंट सांगत व्यावसायिकाची मर्सिडीज कारच्या नावाने 67 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे . व्यावसायिक 3 लाखांच्या एका डिस्काउंट ऑफरमध्ये अडकला आणि मोठी फसवणूक झाली. साहिब गंगवानी असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. 2020 मध्ये त्यांनी मर्सिडीज घेण्याचं ठरवलं. त्यांनी यासाठी ऑनलाईन सर्च करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना मुंबईतील मैत्री ही वेबसाईट दिसली. या वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना मर्सिडीजवर 3 लाख रुपयांची डिस्काउंट ऑफर दिसली. 70 लाखांची मर्सिडीज 67 लाखांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

साहिब यांनी वेबसाईटवर दिलेल्या नंबरवर संपर्क करुन चर्चा केली. समोरच्या व्यक्तीने तो नवी मुंबईत असणाऱ्या एका कंपनीचा एजेंट असल्याचं सांगितलं. दोघांमध्ये चर्चा झाली आणि डीलदेखील झाली. साहिब यांनी 67 लाख रुपये इतकी मोठी रक्कम समोरच्या व्यक्तीने सांगितलेल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली. परंतु एक महिना झाल्यानंतरही कार डिलीव्हर झाली नाही आणि त्याचा नंबर बंद करण्यात आला .

70 लाख रुपयांची गाडी 67 लाखांत, या केवळ 3 लाखांच्या ऑफरच्या जाळ्यात अडकून त्यांना 67 लाखांचा मोठा फटका बसला. साहिब यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून तपास सुरू आहे. पोलीस मोबाईल नंबर आणि बँक खात्याची माहिती मिळवत असून खोट्या वेबसाइटवरून गंडा घालण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.


शेअर करा