मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख , अजित पवारांनी ‘ शेलक्या ‘ शब्दात राणेंना फटकारले

चिपळूण दौऱ्यावर असताना पारा चढलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. आधिकाऱ्यांवर ओरडताना राणे यांचा यांचा संयम सुटला अन् मुख्यमंत्र्यांबद्दल देखील एकेरी बोलले. या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राणे यांच्या अशा उल्लेखाने शिवसैनिक तर भडकले मात्र अजित पवार यांनी देखील राणे यांना खडे बोल सुनावले आहेत.

अजित पवार काय म्हणाले ?

राज्यात पूरस्थिती उद्भवली आहे. या संकटाच्या काळत राजकीय नेते दैौरे करत आहेत. केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षातील नेते आणि राज्यातील मंत्रीही दौरे करत आहेत. तो सर्वांचा अधिकार आहे. आम्हीही विरोधात असताना अशा परिस्थितीत दौरे केले, पण त्यावेळी जिल्हाधिकारी कुठे आहेत?, तहसीलदार कुठे आहेत? अशी विचारणा करत बसलो नाही. काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कुणीही कधीही वापरली नव्हती. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलाय की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला आलात ?

राणे काय म्हणाले होते?

चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्याने नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन जाब विचारला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. राणेंचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलतानाचा हा व्हिडीओ सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.”