होम डिलिव्हरीचा गॅस ‘ असाही ‘ व्हायचा चोरी, नगरमध्ये भरवस्तीत चोरीचा अद्भुत प्रकार उघडकीस

ग्राहकांना गॅस सुविधा देण्यासाठी गॅस एजन्सीच्या घरगुती टाक्यांमधून डिलिव्हरी बॉय चक्क दोन किलो गॅस चोरत असल्याची धक्कादायक बाब नगर येथे उघडकीस आली आहे. तोफखाना पोलिसांनी गॅस चोरत असलेल्या तीन जणांना रंगेहाथ अटक केली आहे. विशेष म्हणजे भरवस्तीत नगर शहरातील सिव्हिल हडको येथे हा प्रकार सुरू होता. पोलिसांनी छापा टाकून या चोरीचा पर्दाफाश केला आहे

भगवान गिरीधारीराम बिष्णोई ( वय 23 राहणार जोधपुर ,राजस्थान खाली राहणार सिव्हिल हडको ) , भजनलाल जगदीश बिष्णोई ( वय 21 ) आणि एक अल्पवयीन मुलगा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील भगवान बिष्णोई हा नगर येथील कराचीवाला भारत गॅस एजन्सी इथे डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होता. गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून ग्राहकांना देण्यासाठी टाक्या टेम्पोमध्ये भरल्यानंतर हा टेम्पो सिव्हिल हडको येथे येत असे आणि इथे तीन आरोपी प्रत्येक घरगुती गॅस टाकी मधून दोन किलो गॅस चोरून तो गॅस व्यावसायिकांसाठी दिल्या जाणाऱ्या टाक्यांमध्ये भरत होते. चोरीची ही बाब तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख तथा पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांना समजली आणि त्यानंतर त्यांनी सापळा लावून आरोपींना रंगेहाथ अटक केली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 43 सिलेंडर, एक ॲपे रिक्षा, गॅस भरण्यासाठी वापरला जाणारा एक लोखंडी पाईप, दोन वजनी काटे, गॅस शेगडी आणि रेगुलेटर असा एकूण 93 हजार 174 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या विरोधात उपनिरीक्षक मेढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक सुरज मेढे, हेड कॉन्स्टेबल शकील सय्यद, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, अहमद इनामदार, वसीम पठान, शैलेश गोमसाळे, सचिन जगताप, अनिकेत आंधळे व अभिजित बोरुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.