नगर जिल्ह्यात नागोबाच्या वाडीतच बनावट दुधाचा कारखाना सापडला , अशी झाली कारवाई ?

गुन्हे करण्यासाठी आजकाल कोण काय पद्धत वापरेल याचा काही नेम राहिला नाही. नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा व नागोबाची वाडी येथील बनावट दूध बनवणाऱ्या दोन संकलन केंद्रांवर पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवार दिनांक 28 रोजी सकाळी छापा टाकला त्यावेळी तेल व पावडरच्या सहाय्याने बनवलेले भेसळीचे 2118 लिटर दूध यावेळी नष्ट करण्यात आले.

नागोबाची वाडी येथील रहिवासी हरिभाऊ एकनाथ गोपाळ घरे याच्या मालकीच्या खर्डा व नागोबाची वाडी येथील भगवान कृपा दूध संकलन केंद्रावर बनावट दूध तयार केले जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळीच पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला. नागोबाची वाडी येथून 878 लिटर तर खर्डा येथील येथून 1240 लिटर असा एकूण 2118 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला.

बनावट दूध तयार करण्यासाठी 1647 किलो पावडर, 30 लिटर खाद्यतेल, केमिकल व अन्य बनावट दूध बनवण्याचे साहित्य दूध संकलन केंद्रातून जप्त करण्यात आले. कारवाई केलेल्या पथकात पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात,अन्न व औषध प्रशासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी उमेश सूर्यवंशी, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल आबासाहेब आवारे, विजय कुमार कोळी, अरुण पवार, संदीप राऊत, कोमल भुंबे आदींचा या पथकात समावेश होता.