नगर हादरले ..स्वतःला इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या

शेअर करा

कोरोनानंतर लोकांचे मानसिक स्वास्थ बिघडल्याच्या अनेक घटना समोर आल्या असताना नगर जिल्ह्यातील देखील एका युवा डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वत:लाच इंजेक्शन टोचवून घेऊन या डॉक्टरने आत्महत्या केल्याचे उघड झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .ते स्वतः आजारी होते आणि याच आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये ही घटना घडली असून डॉ. विश्वास अर्जुन कवळे (वय २९) असे या युवा डॉक्टरचे नाव आहे

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. कवळे यांनी टेबलावरच चिठ्ठी लिहून ठेवली असून आजारपणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असून यासाठी कोणालाही जबबादर धरू नये, असे त्यात म्हटले आहे. आईवडिलांची काळजी घ्या, असे भावंडांना उद्देशून त्यांनी म्हटले आहे. त्यांना नक्की काय आजार होता याबद्दल मात्र माहिती मिळू शकलेली नाही.

डॉ. कवळे यांनी बीएएमएस ही वैद्यकीय पदवी घेतली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिरजगावमधील घरातच त्यांनी दवाखाना सुरू केला. सुमारे दोन वर्षांपासून ते हा दवाखाना चालवित होते. त्यांचा व्यवसायही उत्तम सुरू होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीरही घेतले होते. कुटुंबीय आणि मित्रमंडळीत ते आशू नावाने ओळखले जात. त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक असून मिरजगाव परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ते घरात आले नाहीत, त्यामुळे त्यांची आई त्यांना पाहण्यासाठी खालच्या मजल्यावरील दवाखान्यात आल्या. त्यावेळी डॉ. कवळे त्यांच्या खुर्चीत निपचित पडलेले आढळून आले. हे दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. कुटुंबीय व मित्रांनी त्यांना रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी टेबलावर ठेवलेल्या सुसाईट नोटमध्ये कोणते इंजेक्शन घेतले याचाही उल्लेख केला आहे. याशिवाय संपत्तीचे वाटप कसे करावे, आपल्यावर अंत्यसंस्कार कोठे करावेत, याबद्दल लिहून सर्वांची माफीही मागितली आहे. माझ्या मृत्यूला फक्त मी स्वत: जबाबदार आहे, इतर कोणालाही यासाठी जबाबदार धरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.


शेअर करा