नगर महापालिकेतील गोंधळ , नगररचना विभागातील ‘ ह्या ‘ प्रकरणात अखेर आयुक्तांना वरून आदेश

महापालिकेच्या नगररचना विभागातील के. वाय. बल्लाळ यांना पदावनत ( आहे त्या पदापेक्षा खालील पद देणे ) करण्याच्या कार्यवाहीला दिलेली स्थगिती नगरविकास खात्याने उठवली आहे तसेच बल्लाळ यांना पदावनत करण्यासाठी सहा महिन्यात कार्यवाही न केल्याने आयुक्त शंकर गोरे यांना देखील खुलासा मागण्यात आला आहे. नगरविकास खात्याचे तसे पत्र महापालिकेला शुक्रवारी प्राप्त झाले आहे. नगर महापालिकेत सर्वाधिक कासवछाप म्हणून नगररचना विभागाचा उल्लेख नागरिकांकडून केला जातो. माहिती अधिकारात टोलवाटोलवी करणे, दिशाभूल करणारी उत्तरे देऊन वेळ मारून नेणे असे प्रकार सातत्याने होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांची सर्वाधिक हेळसांड याच विभागात होते म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

महापालिकेतील सर्वाधिक मलाईदार म्हणून चर्चिल्या गेलेल्या या नगररचना विभागातील के. वाय. बल्लाळ यांना दिलेल्या पदोन्नतीवरून आयुक्त शंकर गोरे चांगलेच अडचणीत आले आहेत . बल्लाळ यांना बेकायदेशीररित्या पदोन्नती देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना पदावनत करण्याचा आदेश नगर विकासकडून महापालिकेला देण्यात आला होता. आपल्या विरोधातील या निर्णयाच्या विरोधात बल्लाळ यांनी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे धाव घेतली होती मात्र नगरविकास कार्यालयाकडून देखील बल्लाळ यांना निराशाच हाती आलेली आहे .

यापूर्वी सुनावणी होऊन मंत्री तनपुरे यांनी बल्लाळ यांच्या पदावनत करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली होती आणि याबाबत वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याचा आदेश आयुक्त गोरे यांना दिला होता मात्र आयुक्त शंकर गोरे यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. पंधरा दिवसांपूर्वी बल्लाळ यांच्या बाजूने अहवाल नगरविकास खात्याला पाठविला होता. तो नगरविकास खात्याने अमान्य केला असून, बल्लाळ यांच्या पदावनतीच्या कार्यवाहीला दिलेली स्थगिती उठविली असल्याने बल्लाळ यांच्यासोबत आयुक्तांच्या देखील अडचणी वाढल्या आहेत. बल्लाळ याना पदावनत करण्याबाबत कार्यवाही का केली नाही ? याबाबतचा खुलासा सादर करण्याचा आदेश नगरविकास विभागाने आयुक्तांना दिला आहे.

नगर रचना विभागातील बल्लाळ यांची पाठराखण करत आयुक्त गोरे यांनी तसा अहवाल नगर विकासला पाठवला होता. सहा महिने गोरे यांनी बल्लाळ यांच्या पदावनती बाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच अहवाल पाठवण्यात देखील विलंब केला आहे, त्यात त्यांनी दिलेला अहवाल देखील नगरविकास खात्याने अमान्य केला असून बल्लाळ यांची पाठराखण करून आयुक्त गोरे देखील चांगलेच अडचणीत आले आहेत.