महाराष्ट्रात ‘ ह्या ‘ जिल्ह्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळला , जाणून घ्या लक्षणे आणि उपचार

महाराष्ट्रात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचं चित्र असताना पुणे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेसमोर मोठं नवं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्रात झिकाचा विषाणूचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळला आहे. पुरंदर तालूक्यातील बेलसर या ठिकाणी झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानं जिल्हा प्रशासनाची आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून कसून तपासणीस सुरुवात केली आहे .

राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रदीप आवटे यांनी महाराष्ट्रात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळ्याची माहिती दिली. झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या 50 वर्षीय महिला रुग्णाची हिस्ट्री तपासणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं देखील यासंदर्भात ट्विट केलं आहे. झिकाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

भारतात 27 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण सापडला होता तर दुसरीकडे ब्राझीलमधल्या माकडांमध्येही झिका आणि चिकनगुनिया विषाणू आढळले आहेत. माणसातून हा संसर्ग माकडांना झाला होता. त्यामुळे अनेक माकडिणींचा गर्भपात करावा लागला होता. एडीस जातीच्या डासांपासून हा विषाणू पसरतो. माकडांना चावलेले डास माणसांनाही चावले की विषाणू पसरू शकतो. गर्भवती महिलांना लागण झाल्यास पोटातील अपत्यात दोष निर्माण होत असल्याने हा विषाणू जास्त घातक आहे.

झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलात राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. 1950 पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला. 2015-16 मध्ये अमेरिकेने त्याला महामारी घोषित केलं होतं.

एडीस जातीचे डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष देखील निर्माण होत. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. ताप, सांधेदुखी, शरीरावर चट्टे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.

हा विषाणू मुख्यत्वे डासांपासून पसरत असला तरी गर्भवती मातेकडून तो गर्भातल्या बाळाला होऊ शकतो. लैंगिक संबंधांतूनही हा विषाणू पसरू शकतो. तसंच, ब्लड ट्रान्स्फ्युजनद्वारेही म्हणजे व्यक्तीला रक्त दिल्यासही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असं अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेचं म्हणणं आहे , मात्र याबद्दल अद्याप 100 टक्के खात्री देण्यात आलेली नाही.

झिका व्हायरसची काय आहेत लक्षणे ?

कोरोना संसर्गाप्रमाणेच झिकाचा संसर्ग झालेल्या अनेकांना कोणतंच लक्षण दिसत नाही. काही जणांना सौम्य लक्षणं दिसतात. त्यात डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, स्नायूदुखी, डोळे लाल होणं, त्वचेवर रॅशेस येणं आदी लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणं दोन ते सात दिवसांपर्यंत दिसू शकतात. झिका संसर्गाने मृत्यू होण्याची शक्यता फारच कमी असते; मात्र गर्भवतींना संसर्ग झाल्यास खूप धोकादायक असतं. कारण त्यांच्या गर्भातल्या बाळांनाही त्याची लागण होते. जागतिक आरोग्य संघटनेचं असं म्हणणं आहे, की ब्राझीलसह ज्या देशांमध्ये झिकाचा संसर्ग पसरला आहे, तिथे गिलेन बॅरे सिंड्रोम होणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तो मज्जासंस्थेचा विकार असून, त्यामुळे लकवा येतो आणि 8.3 टक्के जणांचा मृत्यूही होऊ शकतो.

झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. मार्च 2016 पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे.

फुल शर्ट-पँट घालणं, घराच्या खिडक्यांना जाळ्या लावणं, मच्छरदाणी वापरणं, मॉस्क्विटो रिपेलंट वापरणं आदी काळजी घ्यायला हवी. घराबाजूला डबकी असतील, तर त्यात पाणी साठू देऊ नये, जेणेकरून डासांची पैदास होणार नाही. झिका व्हायरसचा संसर्ग झाला असेल, अशा भागांत जाऊ नये.डासांची संख्या वाढणार नाही आणि डास माणसांना चावणार नाहीत, याची शक्य ती सर्व काळजी घ्यायला हवी.

झिका विषाणूचा संसर्ग झालाच, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत. शरीरात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावं. आराम करावा. आपल्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. स्वच्छता बाळगावी. आपल्या शरीरातलं रक्त किंवा लाळेसह अन्य कोणतेही स्राव निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्यावी. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत.