पोलीस म्हणावं की भाई ? , व्हिडीओ ‘ जसा ‘ तशीच कारवाई देखील भन्नाट

शेअर करा

हातात रिव्हॉल्हर घेऊन व्हिडिओ बनवणं एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलंच अंगलट आलं आहे. अमरावतीतील चांदूर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी महेश मुरलीधर काळे यांनी पोलिसांच्या गणवेशात हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडिओ बनवला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. काळे यांच्या भाईगिरी स्टाईलचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता.

महेश काळे यांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या हातामध्ये रिव्हॉलवर होता तर ते पोलिसाच्या गणवेशात होते. व्हिडिओमध्ये ते म्हणत होते, की ‘अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी १० किमी लांबच ठेऊन यायचं. जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील. कारण कसं आहे, का कायद्याचा बालेकिल्ला म्हणजेच अमरावती जिल्हा.’ त्यांची भाषा पोलिसाला साजेशी असली तरी अशीही भाईगिरी त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. त्यांच्यावर बदली नव्हे तर डायरेक्ट निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने अशा पोलिसी भाईनी यापुढे व्हिडीओ बनवताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे .

महेश काळे यांनी तयार केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी महेश काळे हे आपल्या शासकीय गणवेशाचा आणि रिव्हॉलवरचा गैरवापर करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याची दखल अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ एन हरिबालाजी यांनी दखल घेतली. यानंतर महेश काळे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.


शेअर करा