पुन्हा ‘ दुसरी ‘, नगरमध्ये मुलीनं पंधराव्या वर्षीच दिला बाळाला जन्म आणि त्यानंतर ..

शेअर करा

मातापित्यांनी अवघ्या चौदाव्या वर्षी मुलीचे लग्न उरकुन तिला सासरी पाठवले मात्र वयाचे पंधरा वर्षे पूर्ण होत नाहीत तोच मुलगी गर्भवती झाली आणि प्रसूतीदरम्यान अल्पवयातच गर्भधारणा झाल्याने तिचे बाळ जन्मताच मयत झाले. अल्पवयीन मुलीची ही व्यथा पोलिसांपर्यंत गेल्यानंतर याप्रकरणी शुक्रवारी सहा तारखेला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोरोना सुरू झाल्यानंतर लॉक डाऊनचा फायदा उठवत कमी लोकांमध्ये लग्न करण्याची प्रथा सुरू झाली त्यातून गुपचूप अल्पवयीन मुलीचे लग्न उरकून आपण केलेल्या अशा प्रकाराची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी होत नाही, यामुळे काही प्रमाणात अल्पवयीन मुलींची देखील लग्न उरकून टाकण्यात आली. आर्थिक अडचणीमुळे पालकांनी हे केलेले असले तरी सदर प्रकार कायद्यात बसत नाही. मुलगी अल्पवयीन आहे याची जाणीव असूनही तिचे लग्न केल्याप्रकरणी मुलीचे मातापिता सासरा सासू व पती विरोधात अत्याचार कलम 376 बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल सूचना सुजाता शेळके यांनी फिर्याद दिली आहे

उपलब्ध वृत्तानुसार, नगर मनमाड रोड वरील एक गावातील अल्पवयीन मुलीचे तिच्या आईवडिलांनी मागील वर्षी गावातीलच एका मुलासोबत लग्न लावून दिले होते. वर्षभरातच मुलीला गर्भधारणा झाली. बाळंतपणासाठी काही दिवसांपूर्वी ही मुलगी माहेरी आली होती. 28 जुलै रोजी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिला नगर शहरातील बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी मुलीची प्रसूती झाली मात्र तिचे बाळ जन्मताच मयत होते. मुलगी अल्पवयीन असल्याने ही बाब हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये धाव घेत मुलीचा जबाब घेतला आणि माहेर व सासरच्या नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला

नगर एमआयडीसी येथे याआधीच 30 जुलै रोजी देखील अशाच स्वरूपाचा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास करत असतानाच हा नवीन प्रकार समोर आला असल्याने जिल्ह्यात अशा किती केसेस झाल्या असतील याची कल्पनाही करवत नाही. अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्यानंतर कमी वयात गर्भधारणा झाल्याने मुलींच्या शरीरावर वाईट परिणाम होतो त्यामुळे काही वेळा त्यांच्या जीवितास देखील धोका तयार होतो मात्र याबद्दल काही पालकांना ज्ञानच नसते त्यामुळे असे प्रकार घडतात. कोरोना आल्यानंतर कमी खर्चात लग्न होते म्हणून देखील असे प्रकार घडल्याचे जिल्ह्यात समोर आले आहे.

बालकल्याण समितीचे अध्यक्ष हनीफ शेख यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे प्रमाण वाढलेले आहे. मुलींवर होणारा हा समाजमान्य अत्याचार आहे. आपल्या परिसरातील अशा घटना थांबवण्यासाठी गाव पातळीवर ग्रामसेवक सरपंच अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य यांनी बाल संरक्षण समितीची स्थापना केलेली असते मात्र सदर समिती ही निव्वळ कागदावर असून समितीचे लक्ष नसल्यानेच अशा पद्धतीने बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे याप्रकरणी सर्व दोषींवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे .


शेअर करा