कोंबडीचोर समजून चक्क जमावाने पीएसआयला धरले आणि त्यानंतर.., नगरमधील धक्कादायक घटना

शेअर करा

कधीकधी गैरसमजुतीतून ग्रामस्थांकडून काही अक्षम्य गुन्हे होतात अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील अरणगाव परिसरात घडली आहे. गावरान कोंबडी खरेदीसाठी आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यासह चौघांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली. कदाचित यातून पुढे जीवित हानी देखील झाली असती मात्र वेळीच गावचे सरपंच आल्याने पुढील अनर्थ टळला. शुक्रवारी सहा तारखेला संध्याकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. सदर प्रकारात 25 जणांच्या विरोधात जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध वृत्तानुसार, बुलढाणा नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, संजय विठ्ठल निकाळजे, सूनील निकाळजे, विशाल भानुदास कांबळे ( सर्वजण राहणार भीम नगर, तालुका आष्टी जिल्हा बीड ) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत याबाबत विशाल भानुदास कांबळे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आष्टी तालुक्यातील पांडेगव्हाण येथील वस्तीवर गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे. शुक्रवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका कारमधून सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, विशाल कांबळे, संजय निकाळजे, सूनील निकाळजे पांडेगव्हाणसह इतर ग्रामीण भागात गावरान कोंबडीच्या खरेदीसाठी गेले होते.

बऱ्याच भागात फिरून देखील गावरान कोंबड्यांना न मिळाल्याने ते आरणगाव बसस्थानक परिसरात आले. तिथे दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावली आणि शिवीगाळ करत चौघांनाही कारमधून उतरवले. त्यावेळी बाळासाहेब रावसाहेब मिसाळ, डॉक्टर सुरज रामकिसन जायभाय,रामकिसन सोनबा जायभाय, मधुकर दत्तू जायभाय व इतर (सर्व राहणार वंजारवाडी ) अशा सुमारे 20 ते 25 जणांनी कारवर मोठमोठे दगड फेकून कारच्या काचा फोडल्या कारचे दरवाजे उघडून त्या चौघांना कारमधून बाहेर काढले आणि लोखंडी रॉड, बांबू तसेच दगड काठ्यांनी मारहाण केली तर काहींनी खिशातील 50 हजार रुपये हिसकावून घेऊन मारहाण केली.

किरण कांबळे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत असे सांगत होते मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मात्र याच वेळी ही वार्ता आरणगावचे सरपंच अंकुश शिंदे यांना समजली आणि ते कार्यकर्त्यांसह घटनास्थळी आले त्यानंतर या चौघांची जमावाच्या तावडीतून सुटका करण्यात आली.

जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी, ‘ सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण कांबळे, विशाल कांबळे व इतर दोघे असे चौघेजण कारमधून चालले होते त्यावेळी वंजारवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला . तिथे काही ठिकाणी भर दिवसा घरफोड्या झालेल्या आहेत त्यामुळे त्यांनी वेगळा अर्थ काढून वाहनातील चार जणांना मारहाण केली आणि त्यातून ही घटना घडली. यापुढे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोणी अनोळखी व्यक्ती जात असेल तर मारहाण न करता आधी पोलिसांना कळवावे ‘, असे म्हटले आहे.


शेअर करा