प्रतिबंधित क्षेत्राच्या नाक्यावर ‘ त्या ‘ विषारी बाटलीचा रंगला थरार मात्र … : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये, सुरुवातीला शहरापुरता मर्यादित असलेला कोरोना आता ग्रामीण पातळीवर देखील चांगलाच धुमाकूळ घालू लागला आहे . शासकीय पातळीवर केंद्राचे एक, राज्याचे दुसरे आणि स्थानिक पातळीवर तिसरे आणि प्रत्यक्षात अमलात जे आणतात त्यांचे चौथे असा गोंधळ राज्यभरात सुरु असून यातून नागरिकांशी पोलिसांचे वारंवार खटके उडत आहेत.

यातूनच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश नाकारल्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या एक दाम्पत्याने विषप्राशन करण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावात संध्याकाळी घडला. प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश नाकारल्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या एका दाम्पत्याने पोलिसांच्या समोरच विषप्राशन केले त्यात पत्नीचा मृत्यू झाला तर पतीची प्रकृती गंभीर आहे .

प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश देणाऱ्या नाक्यावर पोलीस जशी वागणूक देतात त्यात काही नवे नाही मात्र तपासणी नाक्यावर आईवडिलांना मारहाण करून अपमानास्पद वागणूक दिली त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोपी या दाम्पत्याच्या मुलाने केला आहे .ओतूर पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची नोंद करण्यात आली असून तालुक्यात या घटनेने मोठी खळब‌ळ उडाली आहे. पोलिसांची अरेरावी सहन न झाल्याने ह्या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

रोहिदास कुशाबा शिंगोटे (वय ४५) आणि त्यांच्या पत्नी अनुजा रोहिदास शिंगोटे (वय ४०, उंब्रज नं. १, ता. जुन्नर) असे या दाम्पत्याचे नाव असून ते भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. गावोगावी टेम्पो नेऊन भाजीपाला विक्री करणारे रोहिदास शिंगोटे आणि त्यांच्या पत्नी अनुजा आपल्या दोन मुलांसह टेम्पो घेऊन मंगळवारी सकाळी उंब्रज येथून बाहेर पडले.मात्र पुन्हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गावात येत असताना त्यांना तपासणी नाक्यावर अडवण्यात आले. आम्ही स्थानिक आहोत आम्हाला गावात जाऊ द्या असे म्हणून त्यांचा पोलिसांशी वाद सुरु झाला. पोलिसांनी सरपंच सपना दांगट, पोलिस पाटील यांना बोलावून समजावले मात्र ते गावात जाण्यावर ठाम होते .

भांडण टोकाला जाताच रोहिदास शिंगोटे यांनी कीटकनाशकाची बाटली आणली पोलिसांसमोर प्यायला सुरु केले. पोलिसांनी त्यांच्या हातातील बाटली हिसकावली मात्र बाटली खाली पडताच त्यांच्या पत्नीने त्यातील विष प्राशन केले. पोलिसांनी तातडीने दोघांना ओतूर येथे उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान अनुजा यांचा मृत्यू झाला. रोहिदास यांच्यावर नारायणगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

करोनाचे पाच रुग्ण सापडल्याने उंब्रज गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. तपासणी नाक्यावर पोलिसांनी आपल्या पालकांना मारहाण केली आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे आईवडिलांनी हे पाऊल उचलल्याची तक्रार या दाम्पत्याच्या मुलाने केली आहे. दोषी पोलिसांवर कारवाईची करण्यात यावी, अशी त्यांच्या मुलाची मागणी आहे .

या संपूर्ण प्रकरणाची अतिरिक्त पोलिस अधीक्षकांमार्फत चौकशी करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. पोलिस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून माल आहे पण क्षेत्रे प्रतिबंधित असल्याने विक्रीसाठी जाता येत नाही, जिकडून माल आणायचा तिकडे वेगळेच नियम, जिथे विकायचा तिथे नियम वेगळे अशा असंख्य अडचणी लोकांपुढे असून पोलिसांनी थोडी संयमी भूमिका घेण्याची गरज निर्माण झालेली आहे .


शेअर करा