नगरमध्ये पोलिसांच्या गाडीतून ओढून आरोपीवर प्राणघातक हल्ला ? , पोलिसांचा ‘ वेगळाच ‘ दावा

शेअर करा

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस फरार आरोपीला ताब्यात घेऊन जात असताना रस्त्यात तो गंभीर जखमी झाला कि पोलिसांची गाडी अडवून आरोपीला काही जणांनी मारहाण केली यामागील सत्य अद्याप बाहेर आलेले नाही मात्र या आरोपीची प्रकृती चिंताजनक आहे. पाच जणांनी पोलिसांचे वाहने अडवून लोखंडी रॉडने मारहाण केल्याने माझे पती जखमी झाले आहेत, अशी फिर्याद आरोपीच्या पत्नीने दिली आहे तर पोलिसांनी मात्र या प्रकरणावर बोलताना आरोपीने पोलीस वाहनातून उडी मारल्याने तो जखमी झाला आहे, असा दावा केलेला आहे त्यामुळे या प्रकरणातील सत्य काय आहे ? हे आता चौकशीनंतरच समोर येणार आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रकरणावर बोलताना, ‘ याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून नगर शहराचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल सादर केल्यानंतर या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यात येईल, ‘ असे म्हटले आहे.

सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२ , मुकुंदनगर , अहमदनगर ) असे जखमी झालेल्या आरोपीचे नाव आहे. नगर शहरातील भिंगार नाल्याजवळ रविवारी रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली होती. सादिक बिराजदार याच्याविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 498, 376, बालविवाह प्रतिबंधक कायदा व पॉक्सो अंतर्गत 28 जून 2019 रोजी गुन्हा दाखल झाला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना तो घरी आल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्याला मुकुंदनगर येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले .

पोलीस सादिक याला शासकीय वाहनातून पोलीस स्टेशनला घेऊन जात होते त्यावेळी भिंगार नाल्याजवळ पोलिसांचे वाहन जाताच आरोपी गंभीर जखमी झाला असे पोलिसांचे म्हणणे आहे . त्यानंतर त्याला गंभीर जखमी झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या सादिक लाडलेसाहब बिराजदार हा वेंटिलेटरवर असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. मात्र या प्रकरणात सादिक याच्या पत्नीने पोलिसांवर धक्कादायक आरोप केलेले आहेत. त्यामुळे नक्की काय घडलं याबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सादिक याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या ताब्यातील आरोपीस जर पोलिसांच्या गाडीतून ओढून मारहाण केली जात असेल तर पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण ?

सादिक लाडलेसाहब बिराजदार हा एका कौटुंबिक स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने पोलीस त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन जात असताना मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद याने साथिदारांसह पोलिसांचा पाठलाग करून पोलिसांचे वाहन अडवले आणि सादिकला वाहनातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली , असे परिवाराचे म्हणणे आहे.

सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे रुक्सार बिराजदार यांची तक्रार ?

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सादिक विरूद्ध गुन्हा दाखल असल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता पोलीस घरी आले आणि आणि त्याला घेऊन पोलिस बाहेर पडले. त्यावेळी घराच्या बाहेर मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद थांबला होता. पोलिस निघताच त्याने कोणाला तरी फोन केला आणि काठ्या लाठ्यांसह ताबडतोब या असा निरोप दिला. पोलिस सादिकला घेऊन गेल्यानंतर आम्ही पोलिसांच्या मागे पोलीस स्टेशनकडे निघालो होतो मात्र वाटेतच भिंगार नाल्याजवळ पोलिसांचे वाहन थांबलेले दिसले. त्याच्याशेजारी एक रिक्षाही उभी होती आणि तेथून काही अंतरावर आरोपी सादिक याला लोखंडी रॉडने मारहाण करीत होत मात्र आम्ही जवळ जाईपर्यंत पोलिस त्याला पुन्हा गाडीत बसवून घेऊन गेले.

आम्ही सादिक याच्या मोबाईलवर फोन केला तर तो एका पोलिसाने घेतला व सादिकचा अपघात झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो. तेथे त्याची तपासणी करून डोक्याला मार लागल्याने अन्य रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. यानुसार त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भिंगार पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या ताब्यात असूनही आरोपीला मारहाण झाल्याने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे. तर सादिकच्या कुटुंबियांनी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून आता पोलीस हे प्रकरण कसे हाताळतात ते पाहावे लागेल.


शेअर करा