प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि पुन्हा न्यायालयाने बुधवारी जामीन फेटाळल्याने आठ लाख रुपयांच्या लाचखोरीत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर वीर यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी त्यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आह त्यामुळे दोन दिवस डॉ. झनकर कारागृहातच असतील, हे निश्चित झाले आहे.
शाळेला मंजूर असलेल्या वीस टक्के अनुदानानुसार शिक्षकांचे सुधारित वेतन काढण्याची परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यात आल्याप्रकरणी आरोपी असलेल्या डॉ. वैशाली झनकर वीर यांना मंगळवारी (दि. १७) त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती मात्र त्यावेळी जामिनासाठी भरपूर खटाटोप करूनही तो नामंजूर करण्यात आल्याने छातीत दुखत असल्याचे कारण पुढे करीत त्या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या .
बुधवारी पोलिसांच्या बंदोबस्तात झनकरांची देखभाल सुरु होती मात्र दुपारी अचानक त्रास होत असल्याचे सांगितल्याने त्यांना तपासणीसाठी संदर्भ रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णवाहिकेत त्या ‘ व्हिलचेअर ‘वर होत्या मात्र, रुग्णवाहिकेतून उतरल्यावर त्या ठणठणीत चालू लागल्या . वैद्यकीय तपासणीनंतर झनकरांना डिस्चार्ज देण्याची प्रक्रिया सुरू झाली तर दुसरीकडे बुधवारी पुन्हा न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली मात्र झनकरांचे वकील न्यायालयात उपस्थित नसल्याचे समजले. त्यामुळे न्यायालयाने पुन्हा जामीन अर्ज फेटाळून लावत न्यायालयीन कोठडी कायम ठेवली. सायंकाळी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर झनकरांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याच प्रकरणातील दुसरे आरोपी न्यायालयीन कोठडीतील प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि वाहनचालक ज्ञानेश्वर येवले या दोघांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केल्याने कारागृहात त्यांची सुटका झाली आहे. त्या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. गुरुवारी शासकीय सुटी असल्याने झनकरांच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. झनकर पाच दिवसांपेक्षा जास्त दिवस पोलिसांच्या ताब्यात असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अटळ आहे त्यामुळे झनकरांच्या निलंबनाचे आदेश केव्हा निघतात याकडे लक्ष ठेवलेल्या शिक्षण वर्तुळात शिक्षण आयुक्तांची दिरंगाई का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काय आहे प्रकरण ?
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली पंकज विर उर्फ झनकर (४४) यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. झनकर यांनी तक्रारदाराकडे सुमारे नऊ लाखांची लाचेची मागणी केली होती मात्र फायनल आठ लाख देण्याचे ठरले होते मात्र तक्रारदाराने सापळा रचून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात मंगळवारी (दि.१०) संध्याकाळी अलगद झनकर अडकल्या. पथकाने संशयित चालकासह एका शिक्षकालाही याप्रकरणी ताब्यात घेतले .
शासनाने मंजुर केलेल्या दोन शिक्षणसंस्थांच्या शाळांच्या वीस टक्के अनुदानानुसार नियमित वेतन सुरु करण्याकरिता झनकर यांनी कार्यादेश काढण्यासाठी लाचेची रक्कम मागितली होती मात्र तक्रारदार संस्थाचालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्याचे महासंचालकांकडे तक्रार केली होती. महासंचालकांनी तातडीने पावली उचलली. त्यांच्या तक्रारीची शहनिशा करत पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य जाणवले. यानुसार ठाणे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या आदेशान्वये मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील सापळा अधिकारी पल्लवी ढगे यांच्या पथकाने नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारालगत सापळा रचण्यात आला .
आठ लाखांची रक्कम स्विकारण्यासाठी झनकर यांचा शासकिय मोटार वाहनचालक ज्ञानेश्वर सुर्यकांत येवले हा जिल्हा परिषदेबाहेरील सिग्नलजवळ आला असता त्याने तक्रारदारकाडून रक्कम स्विकारताच पथकाने त्यास रंगेहाथ ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता झनकर यांच्या आदेशान्वये त्याने रक्कम घेतल्याचे समजले आणि तातडीने पथकाने जिल्हा परिषदेच्या वास्तुमध्ये धडक देत झनकर यांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतले सोबतच राजेवाडी प्राथमिक शाळेचे शिक्षक पंकज रमे दशपुते यांनाही पथकाने ताब्यात घेतले होते .