नगरकरांना घरपट्टी पाणीपट्टी माफीसाठी शहर सुधार समिती आक्रमक, काय आहे कलम १३३ अ ?

शेअर करा

नगर शहर सुधार समितीने बीपीएमसी कायदा ‘कलम १३३-अ’ नूसार कोरोना नैसर्गिक आपत्ती काळातील शहरातील नागरिकांची घरपट्टी पाणीपट्टी माफी करावी, म्हणून ताबडतोब विशेष महासभा बोलवुन घरपट्टी पाणीपट्टी माफीचा ठराव मंजुर करावा. यासाठी महानगरपालिका महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती आणि नगरसेवकांकडे मागणी लावून धरली आहे.

ज्या बीपीएमसी १९४९ कायद्यानुसार महानगरपालिकेचा कारभार चालतो, त्याच कायद्यातील ‘कलम १३३-अ’ नुसार नैसर्गिक आपत्ती काळातील घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याचा महानगरपालिकेस अधिकार असल्याने विशेष सभा बोलावुन ठराव मंजुर करून नागरिकांना दिलासा द्यावा. नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेले नागरिक व सन्माननिय नगरसेवकांना भारतीय राज्यघटनेने हा दिलेला हक्क असून घरपट्टी पाणीपट्टी माफी देऊन नागरिकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे .

‘कलम १३३-अ’ या हक्काच्या कायद्याच्या प्रबोधनासाठी शहर सुधार समितीने काल दि.२१ रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते महात्मा फुले पुतळा ते कापडबाजार, चितळेरोड ते दिल्लीगेट अशी प्रबोधन फेरी आयोजित केली होती. प्रबोधन फेरी सुरू झाल्यावर काही वेळाने पावसाची सुरूवात झाली. तरीही समिती सदस्यांनी पावसाला न जुमानता भरपावसात फेरी तशीच सुरू ठेवली होती. समितीच्या फेरीस नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे यावेळी दिसून आले.

भरपावसात प्रबोधन फेरी मार्गावरून शहरातील जनतेचे ‘कलम १३३-अ’ बाबत प्रबोधन करीत आणि कायद्याबाबतचे व महापौर आणि नगरसेवकांना द्यावयाचे मागणीपत्राच्या नमुन्याच्या पत्री वाटत फेरी दिल्लीगेटपर्यंत गेली. अनेक नागरिकांनी या प्रबोधन फेरीस शुभेच्छा दिल्या व कोरोना आपत्तीमध्ये पिचलेल्या सामान्य माणसाच्या अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल आभार मानले. समितीच्या या फेरीमधे शहरात २ हजार पत्रके वाटण्यात आली. प्रबोधन फेरी मार्गावर विविध ठिकाणी फिरोज शेख, कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद, राजेंद्र कर्डिले आदींनी नागरिकांना या कायद्याबाबत माहिती दिली.


शेअर करा