‘ ते ‘ पाच नगरसेवक पुन्हा परतूनही शिवसेनेची डोकेदुखी वाढली : काय आहे बातमी ?

शेअर करा

पारनेरचे ते पाच नगरसेवक शिवसेनेत परतले खरे मात्र पुन्हा शिवसेनेत आल्यानंतर त्यांनी आपला राग हा शिवसेनेवर नव्हे तर माजी आमदार विजय औटी यांच्यावर असल्याचे स्पष्ट केले आहे विजय औटी यांचे विचार हे शिवसेनेचे नसून कम्युनिष्ठ असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे .

शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उषा बोरूडे यांच्यासह नगरसेवक डॉ. मुद्दिसर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी व नंदा देशमाने यांनी एक निवेदन उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. यापूर्वी देखील या नगरसेवकांनी औटी यांच्यावर मनमानी केल्याचे आरोप केले होते. मात्र, आता त्यांच्या विचारसरणीचाच प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांना कम्युनिस्ट आणि काँग्रेस धार्जिने ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.

उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘पारनेर तालुक्याचे कम्युनिस्ट पक्षाचे पहिले आमदार भास्करराव औटी यांचे विजय औटी चिरंजीव आहेत. त्यामुळे यांची विचारसरणी आजही कम्युनिस्ट आहे. १९८५ मध्ये औटी यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. त्यानंतर काँग्रेसच्या माध्यमातून राजकारण करताना त्यांनी नेहमीच शिवसैनिकांना शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळत नसल्याने स्वार्थासाठी त्यांनी २००४ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. शिवसैनिकांच्या जीवावर ते विजयी झाले. मात्र, शिवसैनिकांची सतत हेटाळणी करीत राहिले. आमदार झाल्यापासून त्यांनी तालुक्यात शिवसेनेची एकही शाखा उघडली नाही. तेव्हा तालुका प्रमुख असलेल्या नीलेश लंके यांनी शाखा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यावर औटी यांनी त्यांना अपमानित केले. इतर पक्ष कसे जिवंत राहतील, हे त्यांनी पाहिले. जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही लंके यांच्या पत्नी राणी लंके सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या, परंतु तेथेही औटी यांनी कम्युनिस्ट सदस्य उज्ज्वला ठुबे यांना पुढे करण्याचे पाप केले. जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवार राणी लंके यांना पराभूत करण्यासाठी औटी यांनी विरोधकांशी संधान साधले होते.’

शिवसैनिकांचे श्रद्धास्थान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त औटी यांनी कधीही उपक्रम घेतले नाहीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अभिनंदनाचे फलक लावले नाहीत. पक्षाच्या मुखपत्राला जाहिरातींची मदत केली नाही. शिवसेना प्रमुखांच्या अस्थी तालुक्यात आल्या असता औटी दर्शनालाही आले नाहीत. अस्थींची मिरवणूक काढून सत्ता मिळत नसते अशी दर्पोक्ती करून शिवसैनिकांना अपमानित केले. औटी यांच्या वाढढिवसानिमित्त उद्धव ठाकरे पारनेरला आले होते. तेव्हा औटी यांनीच त्यांच्या ताफ्यावर दगडफेक घडवून आणली आणि लंके यांच्या समर्थंकांनी केल्याचे भासवून लंके यांची पक्षातून हकालपट्टी केली. पंधरा वर्षे शिवसेनेकडून पद उपभोगल्यानंतरही ते पक्षविरोधी भूमिका घेत असतात. विधानसभा निवडणुकीत त्यांचा साठ हजार मतांनी पराभव झालेला आहे. त्यामुळे ते यापुढे राजकारणात टिकण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे त्यांची पक्षातून हक्कालपट्टी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी. अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही.’

उद्धव ठाकरे यांना पाठवलेले हे निवेदन जरी नगरसेवकांनी पाठवले असले तरी त्यांच्या पाठी निलेश लंके असल्याची चर्चा आहे. शिवसेनेत राहूनच आता विजय औटी यांच्याविरुद्ध लढायचे असे आता ह्या नगरसेवकांनी ठरवलेले दिसतंय .मात्र यात शिवसेनेची कोंडी होणार आहे . जर औटी यांच्यावर कारवाई केली तर राष्ट्रवादीचे शिवसेनेने ऐकले असे होणार तर कारवाई नाही केली तर औटी यांच्याबद्दल इतके स्पष्ट निवेदन देऊनही शिवसेना शांत कशी ? असा मेसेज लोकांमध्ये जाईल.


शेअर करा