नगरमध्ये चर्चिलेल्या ‘ त्या ‘ प्रकरणात अखेर तीन पोलीस निलंबीत

शेअर करा

भिंगार कॅम्प पोलिसांनी मागील आठवड्यात पकडलेला आरोपी सादिक बिराजदार याचा मृत्यू वाहनातून पडून जखमी झाल्यामुळे झाला असल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालात समोर आले आहे याशिवाय या प्रकरणात आरोपीला आणताना हलगर्जीपणा केला म्हणून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

फरार असलेला पोक्सो गुन्ह्यातील आरोपी सादिक बिराजदार याला भिंगार कॅम्प पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. त्याला भिंगार पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाल्याजवळ त्याने गाडीतून उडी मारली आणि तो जखमी झाला, अशी फिर्याद पोलिसांनी दिली आहे मात्र सादिक बिराजदार यांच्या पत्नीने देखील फिर्याद दिली असून त्यात बाहेरून आलेल्या पाच जणांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सादिक बिराजदार याला मारहाण करून जखमी केले असे म्हटलेले आहे. खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना 21 ऑगस्ट रोजी त्याचा मृत्यू झाला.

सोमवारी पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी केलेला प्राथमिक चौकशीचा अहवाल व शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला त्यात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. बिराजदार प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहाय्यक फौजदार मैनुद्दिन इस्माईल शेख व पोलीस नाईक अंबादास पालवे यांना हलगर्जी केल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.

वैद्यकीय अहवालानुसार बिराजदार याचा मृत्यू वाहनातून पडून झाल्याचे दिसत आहे मात्र तरीही बिराजदार यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार सखोल तपास सुरू सुरू आहे. सीआयडी देखील या प्रकरणाची चौकशी करत आहे, त्यामुळे हा सर्व तपास पूर्ण झाल्यावर बिराजदार यांचा मृत्यू कशाने झाला आणि यात नेमके दोषी कोण आहेत हे समोर येईल असे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

नगर शहरात चक्क पोलिसांची गाडी अडवून आरोपीस बाहेर काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आला होता .पोलिसांनी आरोपीस वाचवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा देखील धक्कादायक आरोप पोलिसांवर करण्यात आलेला होता .सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२ रा. मुकुंदनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या आरोपीचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सादिक याच्या कुटुंबियांनी केलेली होती.

रविवारी (दि. १५ ऑगस्ट) रात्री भिंगार नाल्याजनिक ही घटना घडली. सादिक लाडलेसाहब बिराजदार हा एका कौटुंबिक स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने पोलीस त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन जात असताना मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद याने साथिदारांसह पोलिसांचा पाठलाग करून पोलिसांचे वाहन अडवले आणि सादिकला वाहनातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली , असे परिवाराचे म्हणणे आहे.

सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा