
अनेक जण धार्मिक परंपरेनुसार वेगवेगळे उपवास करत असतात आणि उपवासासाठी म्हणून केळी खातात. बाजारात देखील अशा उपवासाच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात केळीची आवक असते. शेतकरी बांधवांना देखील यातून काही प्रमाणात फायदा होतो मात्र व्यापारी वर्गाकडून अनेकदा केळीला मागणी असल्याकारणाने पावडर लावून केळी कृत्रिमरीत्या पिकवण्याचे देखील प्रकार सातत्याने घडत आहेत .
नगर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाला याविषयी कारवाईचे अधिकार आहेत मात्र अशा प्रकारावर एकही कारवाई अद्यापपर्यंत केली असल्याचे कुठेही दिसून आलेले नाही. एकदा पिकवल्यानंतर जास्त दिवस केळी साठवून ठेवणे हे देखील शक्य होत नाही त्यामुळे कृत्रिमरीत्या केळी पिकवून टाइमिंग व्यापारी वर्गाकडून साधला जातो आणि प्रसंगी त्यासाठी नागरिकांच्या जीविताशी देखील खेळ केला जातो.
केळीला कृत्रिम पावडरमध्ये काही काळ ठेवल्यानंतर पिवळा रंग येतो आणि नैसर्गिकरीत्या ती केळी पिकलेली आहे असा गैरसमज होऊन नागरिक केळी विकत घेतात मात्र त्यातून आरोग्याला देखील धोका निर्माण होतो. नगर शहर आणि जिल्ह्यात नैसर्गिकरीत्या पिकवलेली केळी मिळणे सध्या दुर्मिळ झालेले आहे. कृत्रिमरीत्या पिकवलेल्या केळीचा देठ हा हिरवा किंवा पिवळा असतो तर नैसर्गिकरीत्या पिकलेल्या केळीचा देठ हा काळा असतो. केळीचा देठ पाहून त्यानंतरच केळीची खरेदी करावी जेणेकरून आपल्या आरोग्याला धोका होणार नाही