आधी रस्ता तरच उपोषण मागे , चौथ्या दिवशीही कणगरे कुटुंबीय उपोषणावर ठाम

शेअर करा

नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात घोगरगाव इथे तहसीलदार यांनी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करत एकदा खुला केलेला रस्ता पुन्हा अडवण्याचा प्रकार समोर आलेला असून तहसीलदारांनी तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर देखील दलित वस्तीअंतर्गत जाणारा रस्ता बंद केला असल्याकारणाने पीडित कुटुंबीय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर समोर उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

आज उपोषणाचा चौथा दिवस असून संपूर्ण कुटुंबातील सुमारे आठ जणांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असे सांगितलेले असून आज प्रशासनाकडून बीडीओ सुरेश पाटेकर , सर्कल अधिकारी व्ही. एम . दगडखेर आणि ग्रामसेवक यशवंत तुपे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत उपोषणाचा निर्णय ठाम असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले आहे. आज रात्री साडेनऊच्या सुमारास ही चर्चा संपली मात्र अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही . कुटुंबियांचे मेडिकल चेकअप जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून नियमित केले जात असून आज वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव तसेच वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हा जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी उपोषण करणाऱ्या कुटुंबियांच्या प्रकृतीची भेट देऊन विचारपूस केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, शकुंतला अण्णासाहेब कणगरे आणि त्यांच्या कुटुंबीयाची मौजे घोगरगाव येथील गट क्रमांक 255 आणि 256 मध्ये जमीन असून त्यांच्या घराकडे आणि शेतीकडे जाण्याचा रस्ता त्यांच्याच भावकीतील अविनाश नाना कणगरे ,वसंत नाना कणगरे ,प्रभाकर नाना कणगरे यांनी अडवून ठेवल्याप्रकरणी तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारदार कुटुंबीयांनी अर्ज दाखल केलेला होता. तहसीलदार यांनी 2017 मध्ये हा रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करून दिला त्यानंतर या रस्त्याचे काही प्रमाणात खडीकरण आणि मुरुमीकरण देखील करण्यात आले मात्र पुन्हा एकदा जून महिन्यानंतर हा रस्ता अडवण्यात आलेला असून हा रस्ता खुला करावा या मागणीसाठी शकुंतला कणगरे यांच्या कुटुंबीयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.

उपोषणासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले असून त्यामध्ये त्यांच्या घरात शाळेत जाणारी मुले असून शाळेत ये जा करणे त्यांना अशक्य झालेले आहे. रस्ता बंद केल्यामुळे शेतात मशागत करण्यासाठी जाता येत नाही आणि शेतजमीन देखील पडीक झालेली आहे. ज्या व्यक्तींनी हा रस्ता अडवलेला आहे त्यांना राजकीय पाठबळ असल्याकारणाने सरकारी निधीत देखील त्यांनी फेरफार करत कणगरे कुटुंबीयांवर अन्याय सुरू केलेला आहे. आरोपींनी याआधी देखील उपोषणकर्त्या कुटुंबियांच्या घरातील महिलांना मारहाण केलेली आहे. वेळोवेळी तहसीलदार साहेब , पोलीस स्टेशन नेवासा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी देऊन देखील हा रस्ता खुला करण्यात आलेला नाही असे उपोषणकर्त्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

प्रतिनिधीशी बोलताना शकुंतला कणगरे यांच्या कुटुंबीयांनी , आरोपींनी या आधी देखील आमच्या घरातील महिलांना मारहाण केलेली असून आरोपी व्यक्ती हे आधी जेल भोगून आलेले असल्याने कुणाला मोजत नाहीत असे म्हटलेले आहे . सरकार दरबारी आपल्याला कुठलाही न्याय मिळत नाही तर दुसरीकडे आरोपीची पाठराखण प्रशासनाकडून सुरू असल्याने आपल्या जीविताला देखील धोका आहे असे सांगत 12 तारखेपासून त्यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. कणगरे कुटुंबियांच्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडी नेवासा सोबतच केंद्रीय लोकशाही पत्रकार संघ यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे


शेअर करा