वडीलांनी आत्महत्या करूनही आमच्या कुटुंबाला न्याय नाही , अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी उपोषण सुरु

शेअर करा

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेकटे बुद्रुक इथे ओढा बुजवल्यानंतर एका वयोवृद्ध व्यक्तीने सरकार दरबारी अनेकदा पाठपुरावा केला आणि अखेर या घटनेतून वाद निर्माण झाल्यानंतर हतबल झालेले वृद्ध व्यक्ती यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. वडिलांना विषारी औषध घेण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत हतबल झालेल्या कुटुंबीयांनी त्यानंतर शेवगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला.वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर देखील या कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे. आपल्या वडिलांना न्याय मिळावा आणि सरकार दरबारी वेळोवेळी उंबरठे झिजवून देखील ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय दिला नाही त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नगर इथे कुटुंबीयांनी आमरण उपोषण सुरू केलेले असून आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

उपलब्ध माहितीनुसार , सुभाष विनायक गरड असे आत्महत्या केलेल्या मयत वयोवृद्ध इसमाचे नाव असून यासंदर्भात त्यांचा मुलगा असलेले रघुनाथ सुभाष गरड यांनी ( राहणार शेकटे बुद्रुक तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर ) यांनी कुटुंबीयांसोबत शेवगाव पोलिसात फिर्याद देखील दिलेली होती. शेतकरी कुटुंबातील आमच्या परिवाराला कोणीही न्याय दिला नाही असे त्यांचे म्हणणे आहे

उपोषणकर्ते व्यक्ती यांच्या शेतीच्या शेजारी हरिश्चंद्र नानासाहेब गरड , जयराम म्हस्के , अशोक श्रीधर गरड आणि एकनाथ श्रीधर गरड आणि एक महिला यांची शेती असून यासंदर्भात कोर्टात वाद सुरू आहे . कोर्टात प्रकरण सुरु असतानाही तिथे झाड कापत असलेल्या एका माणसाला हा प्रकार न करण्याचे सुभाष गरड यांनी सांगितले म्हणून राग आल्याने हरिश्चंद्र नानासाहेब गरड व इतर आरोपी यांनी सुभाष गरड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि विष पाजून तुला मारून टाकतो अशी धमकी दिली . हतबल झालेले वयोवृद्ध इसम सुभाष गरड यांनी त्यानंतर विषप्राशन केलेले होते अन त्यांचा अखेर मृत्यू झाला. त्या संदर्भात पोलिसात देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सुभाष गरड यांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांना आरोपींनी केस मागे घेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. ‘ आमच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे अशा परिस्थितीत आम्ही केस मागे घेणार नाही ‘ असे सांगितल्यानंतर आरोपींना त्याचा राग आला आणि त्यांनी पुन्हा एकदा तक्रारदार कुटुंबीयांना ‘ तुम्हालाही वडिलांप्रमाणेच विष घ्यायला भाग पाडू ‘ अशी धमकी दिली त्यासंदर्भात देखील पोलिसात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र पोलिसांकडून आरोपींवर कुठलीही कारवाई केली जात नाही असा आरोप उपोषणकर्त्या कुटुंबीयांनी केलेला आहे. सरकार दरबारी उंबरठे झिजवून देखील आमच्या वडिलांना शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही उलट त्यांची सरकारदरबारी सातत्याने हेळसांड करण्यात आली म्हणून शेवगाव तहसीलचे अधिकारी आणि शेवगावचे पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कुटुंबीयांनी उपोषण सुरू केलेले आहे .


शेअर करा