अखेर सातव्या दिवशी कणगरे कुटुंबीयांचे उपोषण मागे , वंचितच्या पाठपुराव्याला यश

शेअर करा

नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 12 तारखेला सुरू करण्यात आलेले उपोषण आज 18 तारखेला म्हणजे अखेर सातव्या दिवशी कणगरे कुटुंबीयांकडून मागे घेण्यात आलेले आहे. तलाठी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली आणि रस्ता खुला असल्याचा अभिप्राय दिलेला होता मात्र कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ‘ अधिकारी येतात त्यावेळी रस्ता खुला करण्यात येतो आणि त्यानंतर पुन्हा बंद करण्यात येतो ‘ असा आरोप करण्यात आलेला होता . जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यानंतर योग्य त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अखेर कणगरे कुटुंबीयांच्या वतीने सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आलेले आहे . वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी या कुटुंबीयांनी उपोषण मागे घेण्याप्रकरणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वंचितचे किरण पाटोळे युवा संघटक,सूरज सोनावणे,अशोक देवढे यांच्यासोबतच ॲड अरुण जाधव राज्य समन्वयक भटके विमुक्त आघाडी यांनी देखील उपोषणस्थळी भेट दिलेली होती. कणगरे कुटुंबीय यांनी माध्यम प्रतिनिधी आणि नगर पोलीस प्रशासनाचे देखील आभार व्यक्त केलेले आहेत .

नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील तलाठी यांनी स्थळनिरीक्षण पाहणी करून जो अहवाल सादर केला त्यामध्ये तहसीलदार यांनी रस्ता केस क्रमांक ७१/२०१७ अन्वये आदेश केलेला रस्ता जाणे येण्यासाठी खुला असल्याचा सोबतच दलित वस्ती सुधार अंतर्गत मंजूर रस्ता हा मुरूम टाकलेला दिसून आला असे म्हटले होते. सदर रस्त्यावर आज रोजी अतिक्रमण झालेले नाही असा अभिप्राय देण्यात आल्यानंतर गटविकास अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी काढण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी आदेश केलेले होते आणि संबंधित कुटुंबीयांना उपोषण थांबवण्याविषयी देखील विनंती करण्यात आलेली होती त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन उपोषण मागे घेण्यात आलेले आहे.

शकुंतला अण्णासाहेब कणगरे आणि त्यांच्या कुटुंबीयाची मौजे घोगरगाव येथील गट क्रमांक 255 आणि 256 मध्ये जमीन असून त्यांच्या घराकडे आणि शेतीकडे जाण्याचा रस्ता त्यांच्याच भावकीतील अविनाश नाना कणगरे ,वसंत नाना कणगरे ,प्रभाकर नाना कणगरे यांनी अडवून ठेवल्याप्रकरणी तहसीलदार यांच्याकडे अनेकदा तक्रारदार कुटुंबीयांनी अर्ज दाखल केलेला होता. तहसीलदार यांनी 2017 मध्ये हा रस्ता पोलीस बंदोबस्तात खुला करून दिला त्यानंतर या रस्त्याचे काही प्रमाणात खडीकरण आणि मुरुमीकरण देखील करण्यात आले मात्र पुन्हा एकदा जून महिन्यानंतर हा रस्ता अडवण्यात आलेला होता आणि हा रस्ता खुला करावा या मागणीसाठी शकुंतला कणगरे यांच्या कुटुंबीयांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली होती .

उपोषणासंदर्भात त्यांनी एक निवेदन दिलेले होते त्यात त्यांच्या घरात शाळेत जाणारी मुले असून शाळेत ये जा करणे त्यांना अशक्य झालेले आहे. रस्ता बंद केल्यामुळे शेतात मशागत करण्यासाठी जाता येत नाही आणि शेतजमीन देखील पडीक झालेली आहे. ज्या व्यक्तींनी हा रस्ता अडवलेला आहे त्यांना राजकीय पाठबळ असल्याकारणाने सरकारी निधीत देखील त्यांनी फेरफार करत कणगरे कुटुंबीयांवर अन्याय सुरू केलेला आहे असेही त्यांचे म्हणणे होते. तहसीलदार साहेब , पोलीस स्टेशन नेवासा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी देऊन देखील हा रस्ता खुला करण्यात आलेला नाही असे उपोषणकर्त्या कुटुंबीयांचे म्हणणे होते .


शेअर करा