
महाराष्ट्रात सध्या एका ग्रामपंचायतीची जोरदार चर्चा सुरू असून पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत ग्रामसभेत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही आदिवासी समाजाच्या नागरिकाने जर धर्मांतर केले तर त्याला आदिवासी म्हणून मिळणाऱ्या सगळ्या योजना बंद करण्यात येतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात काही संघटना धर्मांतरासाठी कार्यरत असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा ग्रामपंचायतीकडून करण्यात आलेला आहे.
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुका हा पूर्णपणे ग्रामीण आणि डोंगराळ भाग असून तेथील बहुतांश लोकसंख्या ही आदिवासी बांधवांची आहे. काही धर्मप्रसारक तिथे सुविधा देण्याच्या नावाखाली प्रवेश करतात आणि हळूहळू नागरिकांचे मतपरिवर्तन आणि बुद्धिभेद करून अखेर त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडतात. आदिवासीबहुल भागात असे प्रकार सातत्याने घडत असून अनेकदा लोक देखील त्यांच्या प्रलोभनांना बळी पडत धर्मांतर करतात .
फक्त धर्मांतर करून त्यांच्या परिस्थितीत फारसा काही बदल होत नाही मात्र कुटुंबाच्या कुटुंब धर्मांतर करत असल्याने अनेकदा हे त्या धर्माच्या विळख्यात अडकून पडतात. गेल्या काही वर्षांपासून असे प्रकार सातत्याने होत असल्याने आदिवासी रूढी परंपरा आणि संस्कृती भ्रष्ट होत असल्याचा ठपका ठेवत खुडेद ग्रामपंचायतीने हे पाऊल उचलले आहे. ग्रामसभेत यासाठी चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.