
नगर शहरातील केडगाव इथे पोटनिवडणुकीच्या वादातून झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी संदीप रामचंद्र गुंजाळ याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळलेला आहे.
शिवसैनिक संजय केशव कोतकर आणि वसंत आनंद ठुबे यांची निवडणुकीच्या वादातून अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती. आरोपीने जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला मात्र तो फेटाळण्यात आला त्यानंतर आरोपीकडून औरंगाबाद खंडपीठाकडे जामीनासाठी धाव घेण्यात आलेली होती तो देखील अर्ज न्यायालयाने फेटाळलेला असून आरोपीच्या अडचणी वाढलेल्या आहेत .
नगर शहरातील केडगावमधील नगरसेवकपदाची निवडणूक 6 एप्रिल 2018 रोजी झाली होती. दुसऱया दिवशी मतमोजणी झाली. यामध्ये काँग्रेसचा नगरसेवक विजयी झाला होता. यादरम्यान निवडणूक प्रक्रिया सुरू असताना संजय कोतकर हे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याने विरोधी पक्षाचे कार्यकर्ते व त्यांच्यात बाचाबाची व वाद झाले होते.
7 एप्रिल 2018 रोजी संजय कोतकर व वसंत ठुबे हे दोघे सुवर्णानगर केडगाव येथे असताना आरोपी संदीप गुंजाळ व इतर आरोपींनी गोळ्या झाडत तलवारीने वार करीत खून केला होता. त्यावेळी 30 ते 40 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला आरोपी फरार झाले होते मात्र त्यानंतर त्यांना पकडण्यात आले. काही वेळानंतर आरोपी संदीप गुंजाळ हा स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता.